वर्धा : शेती कामासाठी मजुरांचा प्रश्न गंभीर आहे. सध्याचे मजुरीचे दर व त्यामुळे शेतीसाठी येणारा खर्च, मजुरांच्या अभावामुळे शेतीची कामे वेळेवर न होणे आणि प्रत्यक्ष शेतीतून मिळणारे उत्पन्न यामुळे शेती व्यवसाय हा खडतर होत आहे. त्यामुळे शासन शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत (Krushi Yantrikikaran Yojana) कृषी यंत्रसामग्री, अवजारे खरेदीस प्रोत्साहन देऊन अनुदान उपलब्ध करून देते. या योजनेतून जिल्ह्यात ४९४ लाभार्थीना ३२१.६७ लाख रुपयांचे अनुदान 'डीबीटी'द्वारे (Mahadbt Portal) वाटप करण्यात आले आहे.
शेतीकरीता लागणारा निविष्ठांचा खर्च कमी करुन उत्पादनामध्ये वाढ करावयाची झाल्यास पारंपरिक शेतीमध्ये बदल करुन आधुनिक पध्दतीने शेती करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. शेतीला आधुनिकतेची जोड दिल्यास मशागत, पेरणी व कापणी पश्चात प्रक्रिया यांत्रिकीकरणाद्वारे केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणे शक्य आहे.
अनुदानावर दिली अवजारे...
वर्धा जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत वर्ष २०२३-२४ व २०२४-२५ मध्ये ट्रॅक्टर, पॉवर टिलर चलित यंत्र व अवजारे, पीक संरक्षण साधने, मनुष्य व बैलचलित अवजारे, प्रक्रिया युनिटस, कम्बाईन हार्वेस्टर व अवजारे सेवा पुरवठा केंद्राची उभारणी आदी अवजारे शेतकऱ्यांना अनुदानावर दिली आहेत. शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभघ्यावा, जेणेकरुन शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे अनुदान मिळणार असून त्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे. या योजनेचा जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
संकेतस्थळावर अर्ज करावा
महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणक प्रणाली विकसित केली आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभघेण्यासाठी शेतकऱ्यांनी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावा. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी व महिला यांना मंजूर कमाल अनुदान मर्यादा प्रतियंत्र किमतीच्या ५० टक्के व इतर लाभार्थीसाठी ४० टक्के अनुदान मर्यादा आहे.