सुनील चौरे
हदगाव तालुक्यातील साखर कारखान्यावर बीड, यवतमाळ आणि आसपासच्या भागातून आलेल्या ऊस कामगारांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. (Sugarcane Workers Story)
रात्री-अपरात्री, कडाक्याच्या थंडीत हातात कोयता घेऊन उसाचा फड कापणारे हे कामगार रात्रीचे दिवस करूनही फक्त ३०० ते ४०० रुपये मजुरी मिळवत आहेत. (Sugarcane Workers Story)
वर्षभराचा खर्च आणि मुकादमांकडून घेतलेली उचल याचा ताळमेळ बसवताना हे कामगार अक्षरशः कोलमडतात. (Sugarcane Workers Story)
कडाक्याच्या थंडीत उसाच्या फडात संघर्ष सुरूच…
पहाटे आपण घेतो तो गरमागरम चहा त्या चहासाठी लागणारी साखर तयार करण्यामागे अशा ऊस कामगारांचा प्रचंड श्रम दडलेला आहे. या कामगारांना अंधारात, थंडीत, काटेरी उसांमध्ये कोयता फिरवताना अंगावर काटा आणणारी कष्ट कहाणी सोबत असते.
कंटाळा केला तर मुकादमांकडून घेतलेली उचल कशी फेडायची हा प्रश्न त्यांच्या गळ्याशी घट्ट अडकलेला. त्यामुळे हे कामगार मशीनसारखे अखंड काम करतात.
झोपड्या, पाणी-अभाव, विजेचा तुटवडा… मूलभूत सुविधा नाहीत
कारखान्याच्या परिसरात तब्बल साडेतीनशे झोपड्या उभारण्यात आल्या आहेत.
पण… पिण्याच्या पाण्याची तीव्र कमतरता
झोपड्यांमध्ये वीज नाही
दिवसा चार्जिंगसाठी किराणा दुकानावर अवलंबून
मोबाइल चार्ज करण्यासाठी ५ रुपये मोजावे लागतात.
दोन मोबाइल असल्यास महिन्यात ३०० रुपयांचा खर्च फक्त चार्जिंगवर होतो.
अपंगत्व, पतीचा मृत्यू… तरीही संघर्ष कायम
गौळ येथील जनाबाई राठोड गेली १५ वर्षे ऊस कामगार म्हणून काम करत आहेत. पोटात सहा महिन्यांचे बाळ असताना पतीचा मृत्यू झाला. काही दिवस भावाकडे आसरा एका पायाने अपंग असूनही पुन्हा ऊस कापणीचे काम सुरू झाली.
मुलगा दहावीपर्यंत शिकून आता ऊस कामगार
सर्वात वेदनादायक म्हणजे, या २० वर्षांत जनाबाई यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळालेला नाही.
कामगारांना साप चावला तरी सुट्टी नाही!
रोहिदास चव्हाण यांना १० डिसेंबर रोजी परड जातीच्या सापाने चावा घेतला. उजवा हात सूजून काळवंडलेला, वेदना सहन न होण्यासारख्या… तरीही ते रोज उसाच्या फडात जावे लागते.
कारण, आराम केला तर उचल कशी फेडणार?
एका हंगामात कमावलेल्या पैशातून वर्षभराचा खर्च भागवायचा असतो.
६०० ते ८०० रुपये रोज, पण खर्च डोंगराएवढा आहे.
ऊस कापणीशी संबंधित तीन प्रकारचे कामगार येथे कार्यरत
ऊस कामगार
ऊस वाहतूक कामगार
मुकादम
मानोरा येथील मुकेश जयसिंग जाधव यांच्या कथेतून परिस्थिती अधिक स्पष्ट होते, मुकादमाकडून १ लाख २० हजार उचल घेतली घरासाठी आणि कामासाठी बैलजोडी खरेदी केले. ३०० रुपये प्रति टन दराने ऊस भरण्याचे काम करत आहे.
पती-पत्नी मिळून दिवसाला ६०० ते ८०० रुपये मिळतात, पण......
दोन बैलांचा चारा, गावातील वृद्ध आई-वडिलांचा खर्च, स्वतः चा व मुलांचा खर्च, घेतलेल्या उचलची फेड या सगळ्यानंतर हातात काहीही रहात नाही. वेळेत फेड न झाल्यास बैल विकावे लागतात, नाहीतर मुकादम पुढील हंगामात कामावर घेत नाही.
ऊस कामगारांचा भवितव्य कोण पाहणार?
चार ते पाच महिने कडाक्याचे काम करून उरलेल्या सात-आठ महिन्यांचा खर्च भागवावा लागतो.
उत्पन्न तुटपुंजे
जीवन सुविधा अपुऱ्या
आरोग्याची घोर उपेक्षा
भविष्य अंधारात
साखर उद्योगाच्या पाठिशी उभे असणारे हे कामगार अजूनही मूलभूत हक्कांपासून वंचित आहेत.
कडाक्याच्या थंडीत कोयता फिरवणाऱ्या ऊस कामगारांच्या जीवनात गोडवा फक्त साखरेत आहे… त्यांच्या जगण्यात मात्र आजही कडवटपणा, संघर्ष आणि उपेक्षा भरलेली आहे.
