सोमनाथ खताळ
बीड जिल्हा हा महाराष्ट्रातील ऊसतोड मजुरांचा सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी तब्बल एक लाखाच्या आसपास मजूर ऊसतोडीसाठी कर्नाटकासह विविध राज्यांकडे स्थलांतरित होतात. (Sugarcane Workers Health Card)
या वर्षीही जिल्ह्यातील सुमारे ९३ हजार १०२ मजूर ऊसतोडीसाठी रवाना झाले आहेत. स्थलांतरित मजुरांना वारंवार आरोग्य समस्या भेडसावत असल्याने, यंदा बीड जिल्हा आरोग्य विभागाने एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला आहे 'हेल्थ कार्ड' मोहीम.(Sugarcane Workers Health Card)
बीड जिल्हा आरोग्य विभागाचा हा उपक्रम हजारो मजुरांसाठी आश्वासक ठरत आहे. स्थलांतरित कामगारांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. 'हेल्थ कार्ड' ही छोट्या आकाराची पण मोठा उपयोग असलेली योजना ठरली आहे.
स्थलांतरापूर्वी आरोग्य तपासणी; ९२ हजारांहून अधिकांना हेल्थ कार्ड
जिल्हा आरोग्य विभागाने मजुरांच्या स्थलांतरापूर्वी गावोगावी आरोग्य शिबिरे आयोजित केली. महिला आणि पुरुष मजुरांची संपूर्ण आरोग्य तपासणी करून त्यांची सविस्तर माहिती नोंदवण्यात आली. या नोंदींच्या आधारे सर्व मजुरांना 'आरोग्य कार्ड' वितरित करण्यात आले.
वितरित हेल्थ कार्ड – ९२,४४५
तपासणी केलेले ऊसतोड मजूर – ९३,१०२
पुरुष – ५०,०६९
महिला – ४३,०३३
ही मोहीम जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, सहायक आरोग्याधिकारी डॉ. रौफ शेख, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सचिन शेकडे, तसेच डॉ. विकास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
गरोदर माता व बालकांवर विशेष लक्ष
ऊसतोड मजुरांमध्ये असलेल्या गरोदर महिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात आली. तसेच बालकांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात आले.
बालकांचे लसीकरण – ५,७२०
आरोग्य विभागाने या कुटुंबांना योग्य आहार, लसीकरणाचे महत्त्व आणि प्रसूतिपूर्व तपासण्या कशा आवश्यक आहेत याबाबत मार्गदर्शन केले.
'हेल्थ कार्ड' कसे उपयुक्त?
मजूर ऊसतोडीसाठी दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर तिथे उपचार मिळवणे अनेकांसाठी कठीण होते. पण आता हे हेल्थ कार्ड दाखवताच डॉक्टरांना मजुरांची संपूर्ण माहिती त्वरित मिळेल.
कार्डवर नमूद काय?
रक्तगट
पूर्वीचे आजार (उदा. दमा, हृदयविकार, मधुमेह)
मागील उपचार
लसीकरणाची नोंद
यामुळे उपचार जलद मिळतील
योग्य औषधे देण्यात डॉक्टरांना सोय
आपत्कालीन स्थितीत वेळ वाचेल
चुकीच्या उपचारांची शक्यता कमी
सरकारी रुग्णालयात मिळणार उपचार
सर्व ऊसतोड मजुरांची तपासणी करून हेल्थ कार्ड दिले आहे. आजही मजुरांची तपासणी सुरूच आहे. कोणालाही त्रास जाणवल्यास जवळच्या कोणत्याही सरकारी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत.- डॉ. उल्हास गंडाळ, जिल्हा आरोग्याधिकारी, बीड
मोहीमेमुळे मजुरांना मिळणार मोठा दिलासा
ऊसतोडीच्या ठिकाणी अनेकदा अपघात, ताप, साप चावणे, पोटाचे विकार, गर्भवती महिलांना येणाऱ्या समस्या यांसारख्या तातडीच्या परिस्थितींना मजुरांना सामोरे जावे लागते. पण आता त्यांच्या हातात असलेले आरोग्य कार्ड त्यांचे 'आरोग्य ओळखपत्र' म्हणून काम करणार आहे. त्यामुळे उपचार मिळणे अधिक सोपे व सुरक्षित होणार आहे.
