Sugarcane Factory : ऊसलागवड घटते आहे, उत्पादन मात्र वाढत आहे. पण या सर्व प्रक्रियेचा फायदा उद्योगपतींनाच मिळत असल्याची भावना शेतकरी आणि कामगारांमध्ये तीव्र आहे.(Sugarcane Factory)
नांदेड जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत सहकारी व खासगी साखर कारखान्यांची संख्या वाढली असली, तरी या उद्योगाचा गोडवा शेतकरी आणि ऊसतोड मजुरांच्या वाट्याला मात्र येत नाही. (Sugarcane Factory)
गाळप हंगाम सुरू असून बाहेरील जिल्ह्यांतून हजारो मजूर नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. पण उद्योगाचा कणा असलेल्या शेतकरी आणि मजुरांना मूलभूत हक्कापासूनही वंचित ठेवण्यात येत असल्याने नाराजी वाढत आहे.(Sugarcane Factory)
ऊस लागवड घटली; भाव मात्र वाढला नाही
जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, गहू, ज्वारी यांच्या पाठोपाठ ऊस हे महत्त्वाचे पीक आहे. पण सततच्या अन्यायकारक धोरणांमुळे ऊसलागवडीत घट दिसू लागली आहे.
२०२४-२५ हंगामातील आकडेवारी
एकूण लागवड क्षेत्र: ३०,७८८ हेक्टर
पूर्व-हंगामी लागवड: १२,३०१ हेक्टर
मागील हंगामातील लागवड: ३८,७८३ हेक्टर
या तुलनेत ऊसलागवडीत तब्बल ८,००० हेक्टरची घट झाली आहे.
साखर उत्पादनाची जिल्ह्याची क्षमता देखील मोठी
वार्षिक सरासरी उत्पादन : १,७७,७६२ मेट्रिक टन
एवढी प्रचंड साखर निर्मिती होत असूनही शेतकऱ्यांच्या उसाला समाधानकारक दर मिळत नाही, ही मोठी विसंगती आहे.
शेतकऱ्यांची मागणी काय?
* प्रति टन किमान ३,५०० रुपये एफआरपी द्यावा.
परंतु वास्तव काय?
* सभासद शेतकऱ्यांना फक्त २,७०० रुपये प्रति टन
* इतर शेतकऱ्यांना तर केवळ २, ५०० रुपये प्रति टन
परिणामी, खर्च निघत नाही, कर्जाचा बोजा वाढतो, आणि ऊसापासून मिळणारा नफा कमी राहतो. या दरांतून शेतकऱ्यांचे हंगामी खर्चही भागत नाहीत.
ऊसतोड मजुरांचे जीवन अंधारातच
दरवर्षी हंगामात मजुरांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. परंतु त्यांच्यासाठी कोणतीही सुविधा नसल्याने त्यांचे जीवन अधिकच कठीण होते.
कामगारांच्या समस्या काय?
* तात्पुरत्या वस्त्यांमध्ये वीज नाही
* पिण्याच्या पाण्याची सोय नाही
* निवाऱ्याची व्यवस्था नाही
* मजुरी तुटपुंजी, वेळेवर मिळत नाही
* कामगारांची संख्या घटते आहे
* साखर उद्योगाला सर्वाधिक आधार देणारे हे कामगार आजही मूलभूत हक्कांसाठी झगडत आहेत.
नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या साखर कारखान्यांची स्थिती
| तालुका | कारखान्याचे नाव |
|---|---|
| अर्धापूर | भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना, देगाव-येळेगाव |
| लोहा | ट्रॅटीवन शुगर्स लि., शिवणी |
| उमरी | एमव्हीके साखर कारखाना, वाघलवाडा |
| मुखेड | शिवाजी सर्व्हिस स्टेशन (शुगर युनिट), बाराहाळी |
| हदगाव | श्री सुभाष शुगर प्रा.लि., हडसणी |
| नायगाव | कुंटूरकर शुगर अॅग्रो प्रा.लि., कुंटूर |
इतके कारखाने सुरू असूनही शेतकरी व मजूर दोघांचीही स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
भविष्यात ऊस उद्योगच अडचणीत येऊ शकतो
शेतकऱ्यांना अपेक्षित दर न मिळाल्यास आणि मजुरांना मूलभूत सुविधा न दिल्यास, याचा थेट परिणाम भविष्यातील ऊस उत्पादनावर होणार हे स्पष्ट आहे. लागवडीचे क्षेत्र आणखी घटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
* कारखान्यांना ऊस उपलब्धता कमी
* उत्पादनात अडथळे
* आर्थिक तोटा वाढण्याची शक्यता
* हजारो मजुरांचा रोजगार संकटात
नांदेडमधील साखर उद्योगाचे चकाकीमागचे वास्तव मात्र फारच कडू आहे. कारखानदार आर्थिकदृष्ट्या सबळ होत असताना शेतकरी आणि कामगारांना न्याय मिळणं अत्यावश्यक आहे.
दरवाढ, सुविधा, आणि योग्य व्यवस्थापन झाले तरच या उद्योगाचा टिकाव लागेल; अन्यथा ऊस उद्योगावर अवकळा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
