नाशिक : निफाड तालुक्यातील तामसवाडी येथे मालेगाव तालुक्यातून ऊसतोडीसाठी आलेल्या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी म्हाळसाकोरे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.
म्हाळसाकोरे येथील वैद्यकीय अधिकारी यांनी निफाड येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्याचा अजब सल्ला दिला. त्यामुळे महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली असून, आठ महिन्यांतील म्हाळसाकोरे आरोग्य केंद्रातील ही दुसरी घटना आहे.
मालेगाव तालुक्यातील गाळण या गावातून निफाड तालुक्यातील तामसवाडी येथे ऊसतोडीसाठी आलेल्या मनीषा गायकवाड या महिलेला गुरुवारी सकाळच्या सुमारास प्रसूती वेदना होऊ लागल्या. आशा सेविका सुनिता शिंदे यांना कळविले. त्यांनी तत्काळ म्हाळसाकोरे येथील आरोग्य केंद्रात गायकवाड या महिलेस दाखल केले.
मात्र, तेथील महिला वैद्यकीय अधिकारी सातपुते यांनी निफाड उपजिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला गायकवाड यांचे पती केवळ गायकवाड यांना दिला. महिलेस सरकारी रुग्णवाहिकेतून निफाड येथे नेताना अर्ध्या रस्त्यातच प्रसूती वेदना अधिक होऊ लागल्याने आरोग्य सेविका स्वप्नपूर्ती गायकवाड व आशा सेविका शिंदे यांनी रुग्णवाहिका उभी केली.
सुखरूप प्रसूती करून निफाड येथील रुग्णालयात दाखल केले. दरम्यान म्हाळसाकोरे आरोग्य केंद्रातील याच वर्षीची दुसरी घटना असून, म्हाळसाकोरे आरोग्य केंद्रांचा निष्काळजीपणा यातून दिसून येत असल्याची टीका ग्रामस्थांनी केली आहे.
माझ्या पत्नीला प्रसूती वेदना जाणवू लागल्याने म्हाळसाकोरे येथील आरोग्य केंद्रात आणण्यात आले, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी इंजेक्शन देऊन निफाडला पाठवण्याचे सांगितले. त्यामुळे तिची रस्त्यातच प्रसूती झाली. रस्त्यात काही दुर्घटना घडली असती, तर याला जबाबदार कोण?
- केवल गायकवाड, महिलेचे पती
