Sugarcane Crushing : वसमत तालुक्यात यंदाच्या गाळप हंगामात उसाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असून, साखर कारखान्यांसोबतच गूळ उत्पादन करणाऱ्या युनिटकडूनही उसासाठी चढाओढ सुरू झाली आहे. (Sugarcane Crushing)
परिणामी संपूर्ण तालुक्यात ऊसतोडणीच्या कामाला चांगलीच गती मिळाली असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.(Sugarcane Crushing)
तीन मोठे साखर कारखाने पूर्ण क्षमतेने कार्यरत
वसमत विभागामध्ये ऊस लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पूर्णा सहकारी साखर कारखाना, कोपेश्वर साखर कारखाना आणि टोकाई सहकारी साखर कारखाना या तीनही साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात जवळपास २० हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड आहे. सध्या या तिन्ही कारखान्यांचा गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू असून, नियमित ऊस पुरवठ्यासाठी ऊसतोडणी वेगाने केली जात आहे.
गूळ कारखान्यांचीही मोठी भूमिका
साखर कारखान्यांव्यतिरिक्त तालुक्यातील विविध भागांत १२ हून अधिक गूळ कारखाने (गूळ युनिट्स) कार्यरत आहेत. गाळपासाठी उसाचा पुरवठा मिळवण्यासाठी या गूळ कारखान्यांमध्येही मोठी स्पर्धा दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या उसासाठी केवळ साखर कारखान्यांवर अवलंबून राहावे लागत नसून, पर्यायी बाजारपेठ उपलब्ध झाल्याचे चित्र आहे.
ऊसतोडणी यंत्रणा पूर्ण क्षमतेने सक्रिय
उसाच्या वाढलेल्या मागणीमुळे आणि गाळप हंगामाला मिळालेल्या गतीमुळे संपूर्ण विभागात ऊसतोडणी यंत्रणा पूर्णपणे सक्रिय झाली आहे. आधुनिक ऊसतोडणी यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून, त्याचबरोबर ऊसतोड टोळ्या, मजूर वर्ग तसेच पारंपरिक बैलगाडीवर आधारित ऊसतोड मजूरही कामाला लागले आहेत.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना
ऊसतोडणीच्या गतीमुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील अर्थचक्राला चालना मिळाली आहे. मजूर वर्गाला रोजगार उपलब्ध झाला असून, वाहतूक, दुरुस्ती, इंधन आदी संबंधित व्यवसायांनाही याचा लाभ होत आहे.
शेतकऱ्यांमध्ये समाधान
उसाला साखर कारखाने आणि गूळ युनिट्सकडून मिळणारी मागणी पाहता शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. वेळेवर ऊस उचल झाल्यास गाळप हंगाम सुरळीत पार पडेल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.
