Sugarcane Crushing : परतूर परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. माँ बागेश्वरी साखर कारखान्याची गाळप क्षमता दुप्पट करण्यात आली असून ५ डिसेंबरपासून दररोज तब्बल १० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी दिली.
यापूर्वी कारखान्याची गाळप क्षमता ५ हजार मेट्रिक टन होती. वाढत्या उसाच्या क्षेत्राचा विचार करून ती आता दुपटीने वाढवण्यात आली आहे.
या नवीन क्षमतेचा शुभारंभ ५ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे परिसरातील ऊस उत्पादकांना अधिक वेगाने गाळप सुविधा उपलब्ध होणार असून गर्दी, उशीर व विलंबाची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
आतापर्यंतचे गाळप व उत्पादन
कारखान्याच्या कार्यक्षेत्रात यावर्षी एकूण ११ हजार ८६१ हेक्टर ऊस क्षेत्र पिकावर आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख २७ हजार ७६५ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले.
१ लाख १२ हजार ५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले
साखरेचा उतारा ९.०९७% इतका नोंदवला गेला आहे
यंदा हंगामात एकूण ११ लाख ५० हजार मेट्रिक टन ऊस गाळपास उपलब्ध राहील, असा अंदाज कारखान्याने व्यक्त केला आहे. गाळप क्षमतेत वाढ झाल्यामुळे संपूर्ण हंगाम सुरळीत पार पडणार असल्याचे कारखाना प्रशासनाचे म्हणणे आहे.
उसाला आकर्षक हमीभाव
शेतकऱ्यांना योग्य परतावा मिळावा म्हणून कारखान्याकडून २ हजार ९०० रुपये प्रतिटन हमीभाव जाहीर करण्यात आला आहे.
हप्त्यांचे विभाजन असे होईल
पहिला हप्ता : २,५०० रुपये तात्काळ
दुसरा हप्ता : २०० रुपये (जून महिन्यात)
तिसरा हप्ता : २०० रुपये (दिवाळीपूर्वी)
रिकव्हरी वाढल्यास ऊस दरातही वाढ करून अधिक रक्कम देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे जाधव यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना कारखान्याचे आवाहन
कारखान्याच्या वाढीव क्षमतेमुळे आता कोणताही ऊस शिल्लक राहणार नाही, अशी खात्री देत शेतकऱ्यांनी इतरत्र न जाता आपला ऊस याच कारखान्यास द्यावा, असे आवाहन शिवाजीराव जाधव यांनी केले. परिसरातील उत्पादकांमध्ये या निर्णयामुळे समाधानाचे वातावरण आहे.
शेतकऱ्यांना दिलासा
दुप्पट गाळप क्षमता, आकर्षक एफआरपी, आणि वेळेत हप्ते अशा सर्व बाबींचा एकत्रित परिणाम म्हणून यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अधिक लाभदायक ठरणार आहे. उसाची वाहतूक व गाळपात विलंब टाळला गेल्याने शेतकऱ्यांचा वेळ व खर्च दोन्ही वाचणार आहेत.
