गोविंद शिंदे
अतिवृष्टी व सततच्या पावसाने यंदाच्या खरीप हंगामात कापूस, सोयाबीनसह उसाच्या पिकालाही मोठा फटका बसला आहे. परिणामी बारूळ व पेठवडज मंडळातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उसाचे उत्पादन निम्म्याहून अधिक घटले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.(Sugarcane crop loss)
बारूळ व पेठवडज मंडळातील अनेक गावांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर उसाचे उत्पादन घेतले जाते. मानार धरण तसेच पेठवडज येथील मध्यम प्रकल्पामुळे या भागात पाण्याची उपलब्धता मुबलक असून सुमारे ८० ते ९० गावांमध्ये उसाचे पीक घेतले जाते. त्यामुळे हा परिसर गेल्या काही वर्षांपासून 'उसाचा पट्टा' म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.(Sugarcane crop loss)
जिल्ह्यातील तसेच शेजारील जिल्ह्यातील साखर कारखाने या भागातील ऊस तोडून नेतात. अनेक गावे राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने ऊस वाहतूक तुलनेने सुलभ होते. (Sugarcane crop loss)
मात्र, काही गावे महामार्गापासून दूर असल्याने तेथील शेतकऱ्यांना ऊसतोड व वाहतुकीसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तालुक्यात साखर कारखाना नसल्याने येथील ऊस उत्पादक शेतकरी जिल्ह्यातील व परिसरातील कारखान्यांवर अवलंबून आहेत.(Sugarcane crop loss)
अतिवृष्टीचा उसावर मोठा परिणाम
यंदा जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले. कापूस व सोयाबीनप्रमाणेच उसाचे पीकही पाण्यात राहिल्याने उत्पादनात घट झाली आहे . यावर्षी उसाचा गळीत हंगाम दिवाळीनंतर सुरू झाला.
सुरुवातीला रस्त्यालगत असलेला ऊस साखर कारखान्यांनी तोडण्यास सुरुवात केली; मात्र शेतात पाणी साचलेले असल्याने अनेक ठिकाणी ऊसतोड उशिरा सुरू झाली.
आता हंगाम हळूहळू वेग घेत असला तरी यंदा उसाचे उत्पादन कमालीचे घटल्याचे वास्तव समोर येत आहे. दरवर्षी एकरी ५० ते ६० टन उत्पादन देणाऱ्या उसाचे यंदा सरासरी ३० ते ४० टनांपर्यंतच उत्पादन मिळत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
खर्च वाढला, उत्पन्न घटले
ऊस हे पीक बारा ते पंधरा महिने सांभाळावे लागते. खते, औषधे, पाणी, मजुरी यावर मोठा खर्च करावा लागतो. मात्र, एवढा खर्च करूनही उत्पादन निम्म्यावर आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे विस्कटले आहे.
गेल्या वर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला होता व ऊसतोड मिळावी म्हणून शेतकऱ्यांना साखर कारखान्यांचे उंबरठे झिजवावे लागले होते. यंदाही परिस्थिती फारशी वेगळी नसल्याचे शेतकरी सांगतात.
दीड हजार हेक्टरवरील ऊस उभा
बारूळ व पेठवडज मंडळातील बारूळ, वळसंगवाडी, धर्मापुरी, चिंचोली, बाचोटी, वरवंट, राहटी, तेलूर, शिरूर, कवठा, मसलगा, काटकळंबा, येलूर, पेठवडज, देवायचीवाडी, नारनाळी, हळदा, चिखली, नंदनवन, मंगलसांगवी, लाठी, उस्मानगर, शिराढोण, दहिकळबा, अलेगाव आदी गावांमध्ये सुमारे दीड हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस उभा आहे.
या क्षेत्रातून साधारणपणे अडीच लाख ५० हजार मेट्रिक टन उसाचे उत्पादन अपेक्षित होते. मात्र, अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे सरासरी उत्पादन एक लाख मेट्रिक टनांच्या आसपासच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोट्यवधींचे नुकसान
उसाचे उत्पादन घटल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज प्रगतशील शेतकरी व्यक्त करत आहेत. शासनाने या नुकसानीची दखल घेऊन पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणीही शेतकरी वर्गातून होत आहे.
हे ही वाचा सविस्तर : Savkari Karja : शेतीसाठी नाही, घरगुती गरजांसाठी सावकारांकडे धाव वाचा सविस्तर
