Soybean Kharedi : राज्य शासनाने हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ३० ऑक्टोबरपासून ऑनलाइन बुकिंग सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र, या वेळी शेतकऱ्यांना बुकिंग करताना आणि विक्रीवेळी अंगठा लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.(Soybean Kharedi)
यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, 'सरकार मदत करत नाही, त्रासच देत आहे' अशी भावना व्यक्त होत आहे.(Soybean Kharedi)
नोंदणी व विक्रीची प्रक्रिया अधिक कठीण!
बुकिंगसाठी शेतकऱ्यांनी स्वतः खरेदी केंद्रावर उपस्थित राहून अंगठ्याचा ठसा देऊन नोंदणी करावी लागणार आहे. नंतर, जेव्हा खरेदीसाठी शेतकऱ्यांचा नंबर लागेल, तेव्हा पुन्हा एकदा अंगठा स्कॅन करणे आवश्यक राहणार आहे.
प्रत्येक केंद्रावर यासाठी प्रिंटर आणि उपकरणे देण्यात येणार असल्याचे सांगितले जात असले, तरी ग्रामीण भागातील अनेक केंद्रांवर तांत्रिक अडचणी असल्याने प्रक्रिया अडखळते आहे.
जाचक अटी म्हणजे भाव टाळण्याचा प्रयत्न!
क्रांतिकारी शेतकरी संघटनेने या निर्णयाचा तीव्र विरोध केला आहे.
आमचा माल, आमचा सातबारा, आमचा आधार मग आम्ही सरकारकडे भीक मागतोय का? फक्त विक्रीसाठी दोनदा अंगठा लावणे म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा आहे. या अटी लगेच रद्द कराव्यात, अन्यथा आम्ही मंत्र्यांना गावात फिरू देणार नाही. - सत्तार पटेल, संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष
त्यांनी पुढे सांगितले की, मागील वर्षी लाखो शेतकरी ऑनलाइन नोंदणी करूनही विक्रीपासून वंचित राहिले होते. यावर्षी पुन्हा तेच चित्र दिसत असल्याचे त्यांनी नमूद केले.
वयोवृद्ध आणि महिला शेतकऱ्यांची गैरसोय
अनेक केंद्रांवर सर्व्हर डाऊन, नेटवर्क समस्या, आणि प्रिंटर अडचणी यामुळे शेतकऱ्यांना दिवसन्दिवस प्रतीक्षा करावी लागते. विशेषत: वृद्ध आणि महिला शेतकऱ्यांना दोन-दोन दिवस खरेदी केंद्रावर थांबणे शक्य होत नाही. त्यामुळे शासनाने ही अट शिथिल करून प्रक्रिया सुलभ करावी, अशी मागणी होत आहे.
वंचित ठेवण्याचा प्रकार!
अंगठा दोनदा का? हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांना हमीभावापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप अरुणदादा कुलकर्णी (जिल्हाध्यक्ष) आणि प्रज्योत हुडे (युवा जिल्हाध्यक्ष) यांनी केला आहे.
त्यांनी इशारा दिला की, जर शासनाने हा निर्णय मागे घेतला नाही, तर आंदोलनाचा इशारा दिला जाईल.
