Solar Pump Scheme : शेतकऱ्याच्या अडचणी संपायचे नाव घेत नाहीत. ओला दुष्काळ, नैसर्गिक संकटे, घटते उत्पादन या सर्वांवर मात करत शेतकरी दुसऱ्या हंगामासाठी सज्ज होत असतानाच महावितरणच्या बेजबाबदार कारभाराने त्यांची चिंता आणखी वाढवली आहे. (Solar Pump Scheme)
'मागेल त्याला सौरपंप' योजनेअंतर्गत पैसे भरूनही एक वर्षापासून सौरपंप मिळाला नाही, त्यामुळे परतवाडा येथील सावळी दातुरा येथील शेतकरी राजेश गोविंदलाल प्रजापती (वय ५०) यांनी २० नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.(Solar Pump Scheme)
अर्ज मंजूर… पैसा जमा… पण सौरपंप गायब!
२६ सप्टेंबर २०२४ : शेतकरी राजेश प्रजापती यांनी सौरपंपासाठी ऑनलाईन अर्ज
९ नोव्हेंबर २०२४ : ३२ हजार ७५ रुपयांचा भरणा
ओसवाल कंपनीद्वारे सर्वेक्षणही पूर्ण
तरीही १२ महिने उलटून गेले, सौरपंप मिळाला नाही
या एक वर्षात त्यांनी महावितरण कार्यालयांची असंख्य पायऱ्या झिजवल्या. प्रत्येकी वेळी 'लवकरच प्रक्रिया सुरू होईल, थोडा वेळ लागेल' अशा टाळाटाळीच्या उत्तरांनी त्यांचा संयम संपला आहे.
महावितरणचा बेजबाबदारपणा
योजना सरकार सांगतं तेवढी परिणामकारक नाही. महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे योजना फोल ठरत आहे.- राजेश प्रजापती, शेतकरी
शासन म्हणते की, सौरपंपासाठी तातडीने कार्यवाही करा, पण वास्तवात महावितरणकडून कोणतीही जबाबदारी घेतली जात नाही, असा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.
बेमुदत उपोषणाचा इशारा
राजेश प्रजापती यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन देऊन कळविले आहे की, २० नोव्हेंबरपासून सौरपंप मिळेपर्यंत बेमुदत उपोषण करणार आहे.
शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी हा लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
सामाजिक कार्यकर्ते प्यारेलाल प्रजापती यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
किती शेतकरी अजूनही वंचित?
किती शेतकऱ्यांनी पैसे भरले?
कितींचे सर्वेक्षण झाले?
किती जणांना सौरपंप मिळालेच नाहीत?
या संदर्भातील पूर्ण आकडेवारी जाहीर करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनांचाही परिणाम नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेबाबत स्पष्ट निर्देश दिले होते की, सौरपंप अर्ज झाल्यानंतर तातडीने लाभ द्यावा. तरीही अमरावती जिल्ह्यातील महावितरणचे अधिकारी हे निर्देश पायदळी तुडवत असल्याचा आरोप आहे.
शेतकऱ्यांची अडचण कायम
या विलंबामुळे रब्बी हंगामातील सिंचनावर परिणाम होत आहे.
पिकांसाठी पाणीपुरवठा अडचणीत
आर्थिक नुकसानात वाढ
सरकारी योजनांवरचा शेतकऱ्यांचा विश्वास ढासळत आहे
'मागेल त्याला सौरपंप' ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात पोहचण्याआधीच महावितरणच्या निष्क्रियतेमुळे अडकली आहे. राजेश प्रजापती यांचे उपोषण हा एक आवाज असला तरी, अशा किती शेतकऱ्यांना अजूनही लाभ मिळालेला नाही, हे समोर आल्यास चित्र अधिक गंभीर असल्याचे स्पष्ट होईल.
