Solar Panel : मागेल त्याला सोलर पंप योजनेच्या माध्यमातून शेतकरी सोलर पंप बसवून घेत आहेत. मात्र सोलरची पॅनलच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सौर पॅनेलवर धूळ बसणे, पालापाचोळा साचणे असे प्रकार होऊ लागले असून यामुळे सौर पॅनलला नुकसान होते आहे. त्यामुळे सौर पॅनलची स्वच्छता करणे गरजेचे आहे.
शेतातील माती, प्रदूषण, परागकण, वाळू, आणि पक्ष्यांची विष्ठा यांसारखे घटक पॅनेलवर जमा होतात. जास्त प्रदूषण, धूळ वादळे, आणि कमी पाऊस असलेल्या ठिकाणी धूळ जास्त जमा होते. दमटपणामुळे धूळ पॅनेलवर चिकटून राहते आणि 'सिमेंट' झाल्यासारखी घट्ट होऊ शकते, ज्यामुळे ती काढणे कठीण होते.
यामुळे काय होते तर ...
कार्यक्षमता कमी होणे : पॅनेलवर धुळीचा थर जमा झाल्यामुळे सूर्याची किरणे सौर पेशींपर्यंत (Cells) पूर्णपणे पोहोचू शकत नाहीत. यामुळे वीज निर्मिती २५% ते ३० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते.
हॉटस्पॉटची समस्या : जर पॅनेलच्या एखाद्या भागावर जास्त धूळ किंवा पक्षांची विष्ठा साचली, तर तो भाग जास्त गरम होतो. याला 'हॉटस्पॉट' म्हणतात, ज्यामुळे पॅनेल कायमचे खराब होऊ शकतात.
बॅटरी चार्जिंगमध्ये अडथळा : कमी वीज तयार झाल्यामुळे बॅटरी पूर्ण चार्ज होत नाही, परिणामी रात्रीच्या वेळी किंवा ढगाळ वातावरणात पंप चालवण्यास अडचण येते.
सौर पॅनेलची स्वच्छता कशी करावी?
योग्य वेळ : पॅनेल धुण्यासाठी नेहमी सकाळची कोवळी वेळ किंवा संध्याकाळची वेळ निवडावी. दुपारच्या कडक उन्हात पॅनेल गरम असतात, अशा वेळी थंड पाणी टाकल्यास काच तडकण्याची भीती असते.
मऊ कापड किंवा ब्रशचा वापर : धूळ पुसण्यासाठी मऊ कापड, स्पंज किंवा मऊ ब्रशचा वापर करावा. कडक ब्रश वापरल्याने काचेवर ओरखडे पडू शकतात.
केवळ पाण्याचा वापर : शक्यतो स्वच्छ पाण्याचा वापर करावा. जर धूळ जास्त चिकट असेल, तरच सौम्य शाम्पूचा वापर करावा. डिटर्जंट पावडर वापरणे टाळावे.
सुरक्षितता : पॅनेल उंचावर असल्यास चढताना काळजी घ्यावी आणि ओल्या हाताने वायर किंवा इलेक्ट्रिकल जोडणीला स्पर्श करू नये.
