Smart Sowing : वाशिम जिल्ह्यातील तब्बल ३२ हजार ३३५ शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीऐवजी 'स्मार्ट पेरणी'चा अवलंब करून नवा आदर्श घातला आहे. १ लाख ३६ हजार २८९ एकर क्षेत्रात सरी-वरंबा, टोकण यंत्र आणि अमर पट्टा पद्धतीने पिकांची पेरणी करण्यात आली.(Smart Sowing)
यामुळे खर्चात मोठी बचत होत असून शाश्वत उत्पन्न मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनातून जिल्ह्यात खरीप हंगामातच शेतकऱ्यांनी बदलाची नांदी केली आहे.(Smart Sowing)
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पिकांची जोखीम कमी करण्यासाठी 'स्मार्ट पेरणी'चा मोठ्या प्रमाणावर अवलंब केला आहे.(Smart Sowing)
जिल्ह्यातील तब्बल ३२ हजार ३३५ शेतकऱ्यांनी १ लाख ३६ हजार २८९ एकर क्षेत्रावर स्मार्ट पद्धतीने पेरणी केली आहे. परिणामी, पावसाच्या अनियमिततेमुळे होणारे नुकसान टळून शाश्वत उत्पन्नाची हमी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.(Smart Sowing)
शेतकऱ्यांनी केली नवी दिशा शोधण्याची तयारी
वाशिम जिल्ह्यात दरवर्षी पावसाच्या कमी-अधिक प्रमाणामुळे खरीप व रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान होत होते. परिणामी, शेतकऱ्यांना मोठ्या खर्चानंतरही समाधानकारक उत्पन्न मिळत नव्हते. याला आळा बसावा म्हणून जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे आणि कृषी विकास अधिकारी अभिजीत देवगीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली 'वत्सगुल्म स्मार्ट पेरणी स्पर्धा - खरीप २०२५' राबवली गेली.
'स्मार्ट पेरणी' पद्धती म्हणजे काय?
या मोहिमेत रुंद सरी-वरंबा पद्धत (BBF), अमर पट्टा पद्धत, मृत सरी काढणे, टोकण पद्धत व सरीवरंबा बर टोकण लागवड अशा आधुनिक तंत्रांचा शेतकऱ्यांनी वापर केला.
यामुळे पावसाळ्यात मृदसंधारण होऊन जमिनीत ओलावा टिकतो, अतिरिक्त पाणी झिरपून जाते, झाडांची घनता योग्य राहते आणि जमिनीची सुपीकताही टिकून राहते.
खर्चात मोठी बचत
पारंपरिक पद्धतीने पेरणी करताना एका एकरात सरासरी ३० किलो बियाण्याची गरज भासत होती. स्मार्ट पद्धतीमुळे २५ ते ५० टक्के बियाण्याची बचत झाली. एकीकडे पिकांचे उत्पादन वाढले तर दुसरीकडे बियाण्याचा खर्चही कमी झाला.
१८ उत्कृष्ट शेतकऱ्यांचा सन्मान
या स्पर्धेत सहभागी शेतकऱ्यांमधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १८ शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच, उत्कृष्ट प्रचार करणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि तालुकास्तरीय तीन कृषी कर्मचाऱ्यांचा देखील सत्कार होणार आहे.
पद्धतीतून बदल घडवणारी क्रांती
स्मार्ट पद्धतीने पेरणीमुळे शेतकऱ्यांना फक्त खर्चातच बचत झाली नाही तर, पिकांचे आरोग्य सुधारून अधिक उत्पन्न मिळण्याची हमीही मिळाली आहे. जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनीही पुढील हंगामात या पद्धतीचा अवलंब करावा, अशी शिफारस प्रशासनाकडून केली जात आहे.
'या' पिकांसाठी केला प्रयोग
खरीप हंगामातील तूर, कपाशी आणि सोयाबीनसह हळद पिकासाठी 'स्मार्ट पेरणी' प्रयोग करण्यात आला आहे.
तालुकानिहाय स्मार्ट पेरणीचे क्षेत्र
वाशिम : १४,०६०.५ एकर
मालेगाव : ८,८११ एकर
कारंजा : ४४,८८९.५ एकर
मानोरा : ७,११२.५ एकर
मंठा-पिर-रिसोड : ४६,९४७ एकर
'स्मार्ट पेरणी' पध्दत उपयुक्त ठरली
दरवर्षी अतिवृष्टी किंवा अवर्षणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी स्मार्ट पेरणी उपयुक्त ठरली आहे. खर्च कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढेही या पद्धतीचा अवलंब करावा. - संतोष वाळके, उपविभागीय कृषी अधिकारी, वाशिम
हे ही वाचा सविस्तर : शेतकरी कंपन्या झाल्या हायटेक, आता शेतीही डिजिटल, योजनाही स्मार्ट