Smart Sowing : नवनवीन प्रयोग करण्याच्या वृत्तीने देपुळ गावातील शेतकऱ्यांनी यंदा आधुनिक 'स्मार्ट पेरणी' तंत्रज्ञानाचा अवलंब केला असून बीबीएफ (Broad Bed Furrow) आणि मृत सरी पद्धतीतून पिकांची लागवड केली आहे.(Smart Sowing)
हळद, तूर, कपाशी, सोयाबीन, भाजीपाला व फळपिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. गावातील जवळपास २५० एकरांहून अधिक जमिनीवर ही पद्धत यशस्वी झाली असून पिकांची भरघोस वाढ होत असल्याचे चित्र आहे.(Smart Sowing)
आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब
गेल्या काही वर्षांत पाऊस अनियमित झाल्याने व जमिनीची धूप होऊन उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धती सोडून नवे मार्ग शोधावे लागत आहेत.
याच पार्श्वभूमीवर देपुळमधील शेतकऱ्यांनी बीबीएफ व मृत सरी पद्धतीचा अवलंब करून पिकांची पेरणी केली आहे. या पद्धतीमुळे पाण्याचा निचरा चांगला होतो, मुळे खोलवर जातात, मातीला हवा खेळती राहते आणि पीक मजबुतीने वाढते.(Smart Sowing)
कृषी अधिकाऱ्यांची पाहणी
१७ जुलै रोजी उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके व तालुका कृषी अधिकारी अतुल जावळे यांनी देपुळला भेट देऊन विठ्ठल गंगावणे यांच्या शेतातील स्मार्ट पद्धतीने लागवड केलेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी तंत्र अधिकारी अनिल राठोड, प्रकाश कोल्हे, मंडळ कृषी अधिकारी शिवाजी जाधव, सहाय्यक कृषी अधिकारी पाईकराव तसेच शेतकरी देवीदास गंगावणे उपस्थित होते.
अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक करताना सांगितले की, स्मार्ट पद्धतीने पेरणी केल्यास उत्पादनात वाढ होऊन पिकाची गुणवत्ता सुधारते. पाण्याचा अपव्यय कमी होतो आणि जमिनीलाही दीर्घकाळ पोषण मिळते.
बीबीएफ आणि मृत सरी पद्धतीची वैशिष्ट्ये
* पाण्याचा निचरा चांगला
* मुळे खोलवर जातात, पीक मजबुतीने वाढते
* उत्पादनात व गुणवत्तेत वाढ
* जमिनीची धूप कमी