Shevga Farming : निसर्गाचा लहरीपणा, बदलते हवामान, वन्यप्राण्यांचा वाढता त्रास तसेच वीज व पाण्याची सततची टंचाई यामुळे पारंपरिक शेती व्यवसाय अडचणीत सापडत आहे. त्यातच लागवड खर्चाच्या तुलनेत अपेक्षित बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे. (Shevga Farming)
या परिस्थितीत काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत नगदी, हमखास उत्पन्न देणाऱ्या आणि तुलनेने अधिक नफा मिळवून देणाऱ्या शेवगा शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी जिल्ह्यातील एकट्या कारंजा तालुक्यात शेवगा लागवडीचे क्षेत्र तब्बल २०० एकरांपर्यंत वाढले असून, ही बाब शेती क्षेत्रासाठी आशादायक ठरत आहे. (Shevga Farming)
आरोग्यदायी व विषमुक्त पीक
शेवगा हे मानवी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाणारे पीक असून त्याची मागणी सातत्याने वाढत आहे. जीवनसत्त्वे, खनिजे आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेला शेवगा विषमुक्त अन्ननिर्मितीसाठी उपयुक्त ठरत आहे.
कमी खर्चात अधिक नफा, दीर्घकालीन उत्पादन क्षमता आणि सुरक्षित बाजारपेठ ही शेवगा पिकाची प्रमुख वैशिष्ट्ये मानली जातात. एकदा लागवड केल्यानंतर सलग पाच वर्षे उत्पादन मिळत असल्याने शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्नाचा आधार मिळत आहे.
आर्थिक नुकसान टळल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव
पारंपरिक पिकांच्या तुलनेत शेवगा शेतीत खर्च कमी असून उत्पादन सातत्याने मिळत असल्याने आर्थिक नुकसान टळत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. बदलत्या हवामानातही हे पीक तग धरत असल्याने शेतकऱ्यांचा शेवगा शेतीकडे कल वाढताना दिसतो आहे.
प्रति किलो ७५ ते ८० रुपये दराने खरेदी
शेवगा उत्पादनासाठी खासगी कंपन्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि हमीदार खरेदीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. रतनकेसरी अॅग्रोव्हेंचर्सकडून शेवगा उत्पादनासाठी तांत्रिक मार्गदर्शन दिले जात असून उत्पादित शेवग्याची प्रति किलो ७५ ते ८० रुपये दराने खरेदी केली जात आहे. तसेच शेतकऱ्यांना त्वरित पेमेंटची सुविधाही देण्यात येत आहे.
कंपनीच्या शेतकरी संपर्क अधिकारी शालू डोंगरे यांनी सांगितले की, योग्य व्यवस्थापन केल्यास प्रति एकर लाख रुपयांपेक्षा अधिक नफा मिळवणे शक्य आहे.
बदलत्या काळात शेवगा शेती फायदेशीर
बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आणि शेतीतील वाढत्या अनिश्चिततेच्या काळात शेवगा शेती अत्यंत फायदेशीर ठरत असल्याचे मत प्रयोगशील शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
शेवगा शेतीकडे वाढता ओढा
कारंजा तालुक्यात वाढत असलेली शेवगा लागवड इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत असून, आगामी काळात शेवगा शेतीचे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पारंपरिक शेतीतील अडचणींवर मात करण्यासाठी शेवगा शेती हा शाश्वत आणि लाभदायक पर्याय ठरत असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे.
बदलत्या हवामानात शेवगा शेती कमी खर्चात दीर्घकाळ उत्पादन देणारी आहे. बाजारपेठ निश्चित असल्याने रोज उत्पन्नाचा मार्ग खुला होतो. विषमुक्त शेतीकडे वळण्यासाठी शेवगा हा उत्तम पर्याय असून कारंजा तालुक्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. -रवींद्र गायकवाड, प्रयोगशील शेतकरी, गायवळ, ता. कारंजा
