Agriculture Scheme : मुख्यमंत्री शाश्वत सिंचन शेततळे योजना ही शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक शेततळे आणि अस्तरीकरणासाठी अनुदान देणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतावरच पाणी साठवण्यासाठी ५० हजार ते ७५ हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते.
योजनेची मुख्य वैशिष्ट्ये
उद्देश : पावसावर अवलंबून असलेल्या कोरडवाहू शेतीला सिंचन संरक्षण देणे आणि शेततळ्यांच्या साठवणुकीतून पिकांचे नुकसान कमी करणे.
अनुदान : विविध आकाराच्या शेततळ्यांसाठी आणि प्लास्टिक अस्तरीकरणासाठी अनुदान उपलब्ध केले जाते.
दीड एकर शेती असणे अपेक्षित
अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर किमान ०.६० हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. शेततळे खोदणे, प्लास्टिक अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचन (ठिबक/तुषार) या घटकांसाठी अनुदान दिले जाते. शेततळ्यातील पाणी वापरून फळबाग, भाजीपाला यांसारखी पिके घेऊन शाश्वत उत्पन्न मिळवणे शक्य होते. ही योजना कृषी विभागामार्फत राबवली जाते आणि 'मागेल त्याला शेततळे' या संकल्पनेवर आधारित आहे.
योजनेसाठी अर्ज प्रक्रिया काय?
यासाठी करायचे अर्ज https://aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना प्रपत्र-इच्छुक लाभार्थ्यांनी डाउनलोड करून घ्यावेत. ऑनलाइन अर्जाची पावती इच्छुक लाभार्थ्यांनी डाउनलोड करून स्वतःकडे ठेवावी. ऑनलाइन अर्ज अपलोड करण्याची प्रक्रिया संकेतस्थळावर उपलब्ध राहील.
शेततळ्याचे असे राहील आकारमान
या योजनेअंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्यांपैकी कोणत्याही एका आकारमानाच्या शेततळ्याची मागणी करता येईल. यामध्ये जास्तीत जास्त ३० बाय ३० बाय ३ मीटर या आकारमानाचे व कमीत कमी इनलेट आउटलेटसह प्रकारामध्ये किमान १५ बाय १५ बाय ३ मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येईल.
लाभार्थी निवड अशी होईल
दारिद्रय रेषेखालील (बीपीएल) शेतकरी व ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली आहे. त्यांच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये ज्येष्ठता यादीत सूट देऊन प्रथम प्राधान्याने त्यांची निवड करण्यात येईल. या व्यतिरिक्त इतर सर्व प्रवर्गातील शेततळे मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची ज्येष्ठता यादीनुसार प्रथम अर्ज सादर करणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे या योजनेअंतर्गत निवड करण्यात येईल.
