नाशिक : स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षात माहे ऑक्टोबर 2025 अखेर जिल्ह्यातील 80 शेतकरी व त्यांच्या वारसांना एकूण रूपये 1 कोटी 59 लाख सानुग्रह प्रदान करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली आहे.
भारत हा कृषी प्रधान देश असून भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात शेतीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे त्यांना अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबाला शासनाच्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेच्या माध्यामतून आर्थिक मदत मिळते.
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास रूपये 2 लाख, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात/ पाय कायमस्वरूपी निकामी झाल्यास रूपये 2 लाख आणि अपघातामुळे एक डोळा व एक हात/पाय कायमस्वरूपी निकामी झाल्यास रूपये 1 लाख आर्थिक सहाय्य मिळते. या योजनेच्या प्रयोजनार्थ कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या सदस्यांमध्ये आई,वडील, शेतकऱ्याची पती/ पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यांचा समावेश ग्राह्य धरण्यात येतो.
योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्याचा रस्ता/ रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणांमुळे विषबाधा, विजेचा धक्का/ वीज पडून मृत्यू व खून, उंचावरून पडून अपघात, सर्पदंश व विंचूदंश, नक्षलईट झालेल्या हत्या, जनावरांच्या खाल्यामुळे/चावण्यामुळे मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल यासह अन्य कोणतेही अपघात ग्राह्य धरले जातात.
या योजेनेत नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, शरीरातील रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरी जवळच्या लाभधारकाकडून खून इत्यादी बाबीचा समावेश नाही.
सन 2025-26 ऑक्टोबर 2025 अखेर अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे 205 व अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांचे 5 असे एकूण 240 प्रस्तावांसाठी रूपये 4 कोटी 16 लाखांचे मंजूर आहेत. यापैकी अपघाती मृत्यू झालेल्या 78 शेतकरी व अपंगत्व आलेले 2 शेतकरी असे एकूण 80 शेतकऱ्यांना एकूण रूपये 1 कोटी 59 लाख सानुग्रह अनुदान वारस व प्रत्यक्ष लाभार्थ्याच्या खाती वर्ग करण्यात आले आहे.
