चिखली : ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधांसह शेतकऱ्यांसाठी शेतात जाणाऱ्या पाणंद रस्त्यांची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची ठरते. (Shet Pandan Raste Yojana)
पेरणीपासून कापणीपर्यंत कृषी यंत्रसामग्रीचा सुरळीत वापर, शेतमालाची वाहतूक आणि बाजारपेठेशी थेट संपर्क साधण्यासाठी शेतरस्ते हा शेती व्यवस्थेचा कणा आहे. (Shet Pandan Raste Yojana)
ही गरज ओळखून आमदार श्वेता महाले यांच्या पुढाकारातून 'मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते' योजनेअंतर्गत चिखली तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतरस्त्यांची कामे सुरू आहेत. सध्या तालुक्यातील एकूण ४८८ शेतरस्त्यांची कामे प्रगतीपथावर असून, यापैकी १४२ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत.
चिखली तालुक्यात गेल्या दशकभरापासून लोकसहभागातून शेतरस्ते खुले करण्याची व्यापक चळवळ राबविण्यात येत आहे. ही चळवळ राज्यभरात 'चिखली पॅटर्न' म्हणून ओळखली जाते.
तत्कालीन तहसीलदार संतोष काकडे यांनी शेतरस्त्यांवरील अनेक वाद मिटवून लोकसहभागाच्या माध्यमातून शेकडो पाणंद रस्ते खुले करून दिले. या खुले झालेल्या रस्त्यांना कायमस्वरूपी स्वरूप देण्यासाठी आमदार श्वेता महाले यांनी सुरुवातीपासूनच विशेष लक्ष दिले आहे.
मातोश्री शेत/पाणंद रस्ते योजना सुरू होताच आमदार महाले यांनी चिखली व बुलढाणा तालुक्यातील ग्रामसेवक व सरपंचांची संयुक्त बैठक घेऊन प्रत्येक गावातील सर्व शेतरस्ते कृती आराखड्यात समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार सुमारे २,८०० किलोमीटर लांबीचे शेतरस्ते प्रस्तावित करण्यात आले. या रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतातील वहिवाट अधिक सुलभ होणार असून शेतकऱ्यांचा वेळ, खर्च आणि श्रम वाचणार आहेत.
१४२ रस्त्यांचे काम पूर्ण
मातोश्री पाणंद रस्ते योजनेअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत २७६, जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत ३७ आणि १७५ सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत.
अशा प्रकारे तीनही विभागांतर्गत एकूण ४८८ कामांना कार्यारंभ आदेश मिळाले. यापैकी सार्वजनिक बांधकाम विभागाचे ३३, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे ३३ आणि सिमेंट काँक्रीटचे ७६ असे एकूण १४२ शेतरस्ते पूर्णत्वास गेले आहेत.
३४६ रस्त्यांची कामे वेगात
उर्वरित ३४६ शेतरस्त्यांची कामे सध्या वेगाने सुरू असून, येत्या काळात ती टप्प्याटप्प्याने पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी वर्षानुवर्षांची अडचण दूर होणार असून शेती कामकाज अधिक गतिमान होणार आहे.
शेतकऱ्यांसाठी योजना ठरणार लाभदायक
राज्य सरकारने अलीकडेच मुख्यमंत्री बळीराजा शेत व पाणंद रस्ता योजना जाहीर केली आहे. आमदार श्वेता महाले यांच्या प्रयत्नांमुळे ही योजना देखील मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे ही नवी योजना राबविताना मातोश्री ग्रामसमृद्धी योजना अबाधित ठेवण्यात आली असल्याने याअंतर्गत यापूर्वी मंजूर झालेल्या शेतरस्त्यांच्या कामांनाही अधिक गती मिळाली आहे.
शेतरस्त्यांच्या या व्यापक जाळ्यामुळे चिखली तालुक्यातील शेती व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून ग्रामीण विकासाच्या दिशेने हा उपक्रम मैलाचा दगड ठरणार आहे.
