गडचिरोली : ग्रामीण भागातील शेतकरीशेतनांगरणीच्या (Shet Nangrani) कामांना हळूहळू सुरवात होत आहे. औताची जागा ट्रॅक्टरने Farm Tractor) घेतल्याने शेतकरी नांगरणीसाठी ट्रॅक्टरचा वापर करीत आहेत; मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही नांगरणीचे दर चढतीवर आहेत. ट्रॅक्टर मालकांद्वारे प्रति तास एक हजार रुपये भाडे घेतले जात आहे. धान लागवडीचा (Dhan Lagvad) खर्च वाढल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
रब्बी पीक (Rabbi Season) निघाल्यावर शेतकरी शेतजमीन नांगरणी करून ठेवत असतात. मार्चनंतर एप्रिल महिन्यात अधूनमधून अवकाळी पाऊस कोसळत आहे. पावसाच्या सरीमुळे अनेक भागातील शेतजमिनीत ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतजमीन नांगरणी योग्य वाटताच नांगरणी करण्याचे काम शेतकऱ्यांनी हाती घेतले आहे. शेतशिवारात सकाळच्या सुमारास ट्रॅक्टरचे सूर कानी पडत आहेत.
तर काही शेतकरी बैलजोडीच्या साहाय्याने नांगरणी करीत आहेत. सध्या शेतातील कामे सर्रास ट्रॅक्टरने केली जात आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर मालकांना रोजगार उपलब्ध होऊन आर्थिक उत्पन्न मिळत आहे. शेतकरी रब्बी हंगाम संपल्यावर शेतातील पाळे व धुन्ऱ्याची दुरुस्ती करीत असतात. त्यानंतर मातीकाम केले जाते. शेतशिवार स्वच्छतेवर भर असतो.
जमीन सुपीकतेसाठी मेंढ्याचा आधार
पिकाची वाढ व्हावी, यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असतात. तसेच दरवर्षी शेणखतही टाकत असतात. तर काही शेतकरी जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी मेंढ्यांचे कळप शेतात बसवित असतात. सध्या शेतशिवार मोकळे असल्याने मेंढ्यांचे कळप बसविणे सोयीचे ठरत आहे. मेंढ्यांच्या संख्येनुसार शेतकऱ्यांना मॅढी मालकांना दाम द्यावे लागते. शेतशिवारात मेंढ्यांचे कळप बसलेले दिसून येत आहेत.
ट्रॅक्टर मालकांनी नांगरणीचे भाडे वाढविल्यामुळे शेती करणेच परवडेनासे झाले आहे. शेतीचा खर्च सातत्याने वाढत असताना हमीभाव उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्याने खर्च भरून निघत नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांसाठी उपाययोजना करावी.
- दिलीप कुथे, शेतकरी, कान्होली.
डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. तसेच चालकांना किमान ५०० रुपये प्रति दिवस द्यावे लागते. ट्रॅक्टर दुरुस्ती खर्च सुद्धा वाढला असल्याने प्रति तास एक हजार रुपये भाडे आकारण्यात येत आहे.
- राहुल हुलके, ट्रॅक्टर मालक.