Rojgar Hami Yojana : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) कामगारांची समोरासमोर हजेरी लावली जाईल. यासाठी, ई-केवायसी आणि फोटो स्कॅनिंग अनिवार्य असून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बनावट उपस्थिती आणि फसव्या कारवाया रोखण्यासाठी सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे.
फेस ई-केवायसी करणे अनिवार्य असून मजुरांनी रोजगार सेवक यांचेमार्फत लवकरात लवकर ई-केवायसी करावी, असे आवाहन गटविकास अधिकारी संदीप पानतावणे यांनी केले आहे. आता कामगारांची उपस्थिती फेस ऑथेंटिकेशन वापरून चिन्हांकित केली जाईल. मनरेगा पोर्टलवरून एनएमएमएस प्रणालीवर कामगारांचे ई-केवायसी आणि फोटो स्कॅनिंग करून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.
या नवीन फेस-रीडिंग, फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानामुळे मनरेगामधील वर्षानुवर्षे चालणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसेल. आता काम चालू होण्यापूर्वी एनएमएमएस अॅपचा वापर करून कामगारांचे फोटो काढून हे छायाचित्र त्यांच्या आधार डेटाशी त्वरित जुळवले जाईल. ज्यांची जुळणी यशस्वी झाली त्यांचेच हजेरीपत्रक निघेल.
बोगस कामगारांपासून पूर्ण पारदर्शकता
त्यामुळे योजनेत बोगस कामगारांपासून पूर्ण पारदर्शकता येणार असून केवळ पात्र कामगारांनाच वेतन मिळावे हे सरकारचे ध्येय आहे. जर एखाद्या कामगाराने अद्याप त्यांचे ई-केवायसी पूर्ण केले नसेल, तर त्यांची उपस्थिती आता नोंदवली जाणार नाही. प्रशासनाने जवळजवळ सर्व पंचायतींमध्ये कामगारांसाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे.