Agriculture News : नाशिकसह राज्यात (Nashik) झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी सरकारकडून मदत देण्यात आली आहे. या मदतीचे वाटप सध्या सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे वाटप (Nuksan Bharpai) केलेल्या अनुदानासंदर्भात विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात माहे सप्टेंबर 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले असून त्याकरिता महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील 4 लाख 9 हजार 474 शेतक-यांना रु. 31715.77 लक्ष इतके निविष्ठा अनुदान प्राप्त झालेले आहे.
जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या मोठी असून दिवाळीपूर्वी मदत संबंधीतांच्या बँक खात्यात जमा करणे व शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार रक्कम आहरीत करण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता सर्व संबंधितांनी घेणे आवश्यक आहे.
त्याअर्थी नाशिक जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला निधी बँकेकडून इतर कर्ज खात्यात जमा केला जातो किंवा त्यांचे बँक खाते होल्ड केले जात असल्याने सर्व बँकांना मी, आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी नाशिक मला प्राप्त अधिकारानुसार खालीलप्रमाणे आदेश निर्गमित करीत आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून वेळोवेळी प्राप्त झालेले अनुदान कोणत्याही परिस्थितीत संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वळती / वर्ग करू नये.
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून वेळोवेळी प्राप्त झालेले अनुदान/मदत ज्या खात्यावर जमा झालेले आहे, त्या खात्यास कुठल्याही परिस्थितीत होल्ड लावू नये. वरील आदेशाचे उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदीनुसार गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल.
