Ranbhaji Ambadi : खानदेश, विदर्भ आणि कोकणामध्ये अंबाडी मोठ्या प्रमाणात आढळते. ही सुमारे १.५ ते २ मीटर उंच वाढणारी वनस्पती आहे. हे झाड सरळ वाढते. अंबाडी दोन प्रकारची असते हिरवी आणि लाल.
अंबाडीची पाने चवीने आंबट असतात. कोवळी असतांना अंबाडीच्या पानांची भाजी करतात. अंबाडी ची फळे आणि बिया औषधी आहेतच पण अंबाडीच्या झाडांचा देखील सुतळी, दोरखंड तयार करण्यासाठी वापर केला जातो.
अंबाडीची भाजी कशी बनवायची?
साहित्य -
१ जुडी अंबाडीची पानं (साधारण दीड कप भाजी चिरून), पाव कप तांदूळ, पाव कप चणाडाळ, 4-5 लाल सुक्या मिरच्या, 10-12 पाकळ्या लसूण, चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून तेल, पाव चमचा मोहरी, 1/2 चमचा हळद, चिमूटभर हिंग.
कृती -
- तांदूळ आणि चणाडाळ धुवून वेगवेगळी ६ तास भिजत घालावी.
- अंबाडीची पानं काढून धुवून घ्यावी फक्त पानं घ्यावी देठ घेऊ नये.
- पानं बारीक चिरून घ्यावी. दाळ, तांदळातलं पाणी काढून टाका. आणि तांदूळ हाताने थोडे चुरून घ्यावे.
- एका पातेल्यात तेल गरम करून मोहरी, हळद, हिंग घालून फोडणी द्यावी.
- लसणाचे मध्यम तुकडे करून फोडणीत घालावे आणि गुलाबी रंगावर परतून घ्यावे.
- लाल मिरच्यांना मध्ये चीर देऊन त्या फोडणीत घालाव्यात.
- आता त्यात चिरलेली अंबाडी तांदूळ आणि डाळ घालावी.
- एकदा ढवळून झाकण ठेवून पाणी न घालता वाफ काढावी
- मिश्रण बुडेल एवढं पाणी घालावं. मीठ घालून मध्ये मध्ये ढवळत राहावं आणि गरजेनुसार थोडं पाणी घालून मंद गॅसवर शिजवून घ्यावी.
- चविष्ट आणि पौष्टिक अंबाडीची तयार भाजी भाकरी / पोळीबरोबर खायला घ्यावी.
अंबाडीच्या भाजीचे अनेक फायदे
- हृदय निरोगी ठेवण्यासाठी अंबाडी फायदेशीर, उच्च रक्तदाब आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत
- वजन कमी करण्यासाठी महत्वाचे. यामध्ये कॅलरी कमी तर जीवनसत्त्वे आणि तंतुमय घटक भरपूर.
- जीवनसत्त्व अ, लोह, झिंक मुबलक प्रमाणात असल्याने डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.
- यामध्ये जीवनसत्त्वे आणि प्रथिने भरपूर प्रमाणात आहेत. केस मजबूत आणि निरोगी होतात.
- हाडे मजबूत करण्यास मदत
- लोहाचे प्रमाण जास्त असल्याने हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी फायदेशीर.
- रक्ताची कमतरता किंवा ॲनिमिया आजार असणाऱ्यांसाठी महत्वाची भाजी.
- डाययुरेटिक गुण असल्याने लघवीला जळजळ होणे, उन्हाळे लागणे यावर उपयुक्त.
- अंबाडी पचायला आणि शिजायला सोपी आहे. त्यामध्ये भरपूर स्टार्च असतात, त्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उपयुक्त.
अंबाडीचे सेवन करताना घ्यावयाची काळजी
- अंबाडीमध्ये पित्तकारक गुणधर्म असल्यामुळे प्रमाणात सेवन करावे.
- स्तनपान करणाऱ्या महिलांनी अंबाडीचे सेवन करू नये.
- त्वचेची ऍलर्जी आणि दमा असलेल्या लोकांनी अंबाडी खाणे टाळावे.
- अंबाडीमध्ये भरपूर ऑक्सॅलिक ॲसिड असते, जे जास्त झाल्यास किडनी स्टोन होऊ शकतो.
- त्यामुळे किडनी स्टोन आजार असणाऱ्यांनी अंबाडीची भाजी खाणे टाळावे.
- ऑक्सॅलिक ॲसिड असल्यामुळे भाजी करताना बिड,ॲल्युमिनियम, तांब्याचे भांडे वापरणे टाळावे.
- श्रीमती सोनाली कदम, सहाय्यक कृषि अधिकारी, येवला
Aghada Ranbhaji : अठरा आजारांवर एकच उपाय आघाड्याची भाजी, वाचा फायदे आणि रेसिपी