नागपूर : जून महिना कोरडा गेला असला तरी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर विभागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. (Rain Impact on Crops)
अतिवृष्टीमुळे तब्बल ४२ हजार ६०० हेक्टर क्षेत्रातील पिकांचा चिखल झाला आहे. प्रशासनाने या नुकसानभरपाईसाठी ३७.७० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून, त्यापैकी १३.५६ कोटींची मंजुरी मिळाली आहे. (Rain Impact on Crops)
सर्वाधिक फटका चंद्रपूर-गडचिरोलीला
शासकीय आकडेवारीनुसार चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक १४,१०५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, त्यानंतर गडचिरोलीत १०,९१२ हेक्टर, वर्ध्यात ९,०९१ हेक्टर, नागपूरमध्ये ५,६४४ हेक्टर, भंडाऱ्यात २,५८९ हेक्टर आणि गोंदियामध्ये २५८ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे.
जिल्हानिहाय बाधित क्षेत्र व नुकसानभरपाई मागणी
जिल्हा | बाधित क्षेत्र (हेक्टर) | मागणी (कोटी) | मंजूर (कोटी) |
---|---|---|---|
नागपूर | ५६४४.०१ | ४.९० | ३.९२ |
वर्धा | ९०९१.३९ | ८.०१ | २.३० |
चंद्रपूर | १४,१०५.७४ | ७.३३ | ७.३३ |
गडचिरोली | १०,९१२.७३ | १२.९० | — |
गोंदिया | २५८.३२ | २.३४ | — |
भंडारा | २५८९.१२ | ४.३३ | — |
कोणत्या पिकांना बसला फटका?
भात पिक : गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर नासाडी
सोयाबीन व कापूस : अतिवृष्टी व पूरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान
फळपिके : नागपूर जिल्ह्यात संत्रा व मोसंबी तर मिरची पिकालाही फटका
पूरस्थितीमुळे अनेक ठिकाणी जमिनी खरडून गेल्या असून, पेरणीनंतर उगवलेली पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
पंचनामे सुरूच
सप्टेंबर महिन्यातील नुकसानाचे पंचनामे अद्याप सुरू आहेत. पिकांच्या नुकसानीची अंतिम आकडेवारी मिळाल्यानंतर शासनाकडून अतिरिक्त मदतीचे प्रस्तावही पाठविले जाणार आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
एकूणच, पावसाच्या थैमानामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक संकट भेडसावले असून, शासनाकडून मिळणाऱ्या मदतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.