नाशिक : जिल्ह्यातील १०५ पैकी ९८ महसूल मंडळांमध्ये ६५ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस नोंदविण्यात आला असून हा पाऊस पिकांना पूर्णपणे नुकसान करणारा असल्याची माहिती कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी दिली. त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. जिल्ह्यातील १८ धरणांतून विसर्ग सोडण्यात आला आहे.
रविवारी पावसाचा जोर दुपारी तीन वाजेनंतर ओसरला. त्यानंतर पिकांचे पंचनामे सुरू करण्यात आले. शनिवारी व रविवारी या दोन दिवसांत जिल्ह्यात ४० हजार हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर आठवडाभरात ३५ हजार हेक्टरहून अधिक भागांत पिकांचे नुकसान झाले आहे. संपूर्ण आठवडाभर झालेल्या परतीच्या पावसाने पिकांचे खूप नुकसान झाले आहे.
कापूस, सोयाबीन, टोमॅटो व मका पिकाला सर्वाधिक फटका झाला बसला आहे. खरीप हंगामामध्ये टोमॅटोचा हंगामात उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्षाच्या काड्या तयार झालेल्या नाहीत.
४८ तासांत जिल्ह्यात संपूर्ण चित्र बदलले
२४ सप्टेंबरपर्यंत केवळ मालेगाव व नांदगाव तालुक्यात शेतीपिकाचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाचा होता. या दोन तालुक्यांत २३ व २४ सप्टेंबरच्या पावसाने १३ हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली होती. इतरत्र पिकांची हानी कमी होती.
मात्र, या दोन दिवसांत सारेच चित्र बदलले अन् ९८ महसूल मंडळामधील पिके पाण्याखाली आल्याने संपूर्ण जिल्ह्यातच आता अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.
असा झाला धरणातून विसर्ग (क्यूसेक)
गौतमी गोदावरी- २०२६ कुसेक, कश्यपी-१२८०, आळंदी-३७५१, भावली-८२२, भाम-२०९३ क्युसेक, वाकी- ६३०, दारणा-९५५२, मुकणे-१९५०, वालदेवी-१३०६, कडवा-४२०४, वाघाड-२८०४, करंजगाव-२४५७०, पालखेड ३०४९८, तीसगाव- ३१०, नांदुरमधमेश्वर - ८७५४९, पुनेगाव-३८४०, ओझरखेड-४०५० क्युसेकने विसर्ग झाला.