Rabi crops : शेतीत नवनवीन पर्यायी पिकांकडे वळण्याचे आवाहन होत असतानाही बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी जवस या उत्पन्न देणाऱ्या पिकाकडे यंदा पूर्णतः पाठ फिरवत असल्याचे चित्र समोर आले आहे. (Rabi crops)
विशेष म्हणजे उत्पादन समाधानकारक, बाजारभाव तुलनेने चांगला आणि मागणीही असतानाही, जवसाची एकरीही पेरणी झालेली नाही, अशी धक्कादायक नोंद कृषी विभागाच्या अहवालात आहे.(Rabi crops)
जवस हे प्रामुख्याने रब्बी हंगामातील पीक असून मध्यम ते भारी, ओलावा टिकवून ठेवणारी आणि उत्तम निचऱ्याची जमीन या पिकासाठी अनुकूल मानली जाते.(Rabi crops)
जमिनीचा आम्ल–विम्ल निर्देशांक साधारणतः ५ ते ६ असणे उपयुक्त ठरते. मराठवाडा व विदर्भात परंपरेने जवसाची लागवड केली जात असली तरी, बदलत्या शेती परिस्थितीत हे पीक हळूहळू दुर्लक्षित होत आहे.(Rabi crops)
८० टक्के उत्पादन तेलासाठी
जवसाच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे ८० टक्के उत्पादन तेलनिर्मितीसाठी, तर उर्वरित २० टक्के धाग्यासाठी वापरले जाते. औषधी, पोषणमूल्ये आणि औद्योगिक वापर लक्षात घेता जवसाला बाजारात कायम मागणी असते. तरीही प्रत्यक्ष शेतात या पिकाचा अभाव दिसून येतो.
जिल्ह्यात २.८८ लाख हेक्टरवर रब्बी पेरा
कृषी विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्याचे रब्बी हंगामातील सरासरी पेरणी क्षेत्र ३ लाख २९ हजार ८०३ हेक्टर आहे. मात्र ऑक्टोबर–नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी व सलग पावसामुळे पेरणीस अडथळे आले.
मागील आठवड्याच्या साप्ताहिक अहवालानुसार, २ लाख ८८ हजार ५४५ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली असून, यामध्ये हरभरा आणि गहू या पिकांचा प्रचंड बोलबाला आहे.
दोन हेक्टरचा अंदाज; प्रत्यक्षात शून्य पेरणी
कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी पीकनिहाय पेरणीचा अंदाज बांधला होता. त्यानुसार १३ तालुक्यांपैकी देऊळगाव राजा तालुक्यात दोन हेक्टरवर जवस पेरणी होईल, असा अंदाज होता. मात्र १६ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात कुठेही जवसाची पेरणी न झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
जवसाकडे पाठ फिरवण्यामागची कारणे
* शेतकरी जवस पिकापासून दूर राहण्यामागे अनेक कारणे पुढे येत आहेत.
* सिंचनासाठी तुलनेने अधिक पाण्याची गरज
* मजुरांची टंचाई
* कीड व रोगांचा वाढता प्रादुर्भाव
* हंगामात दर घसरण्याची भीती
* पक्ष्यांचा उपद्रव
* उत्पादन खर्चात वाढ
* अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान
* पिकाविषयी तांत्रिक मार्गदर्शनाचा अभाव
या सर्व कारणांमुळे शेतकरी सुरक्षित पर्याय म्हणून हरभरा व गहू या पारंपरिक पिकांकडेच वळत असल्याचे चित्र आहे.
बाजारात दर समाधानकारक; तरीही दुर्लक्ष
राज्यातील काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जवसाची खरेदी सुरू आहे. उपलब्ध माहितीनुसार जवसाला प्रतिक्विंटल ४ हजार ५०० ते ६ हजार ४६५ रुपये दर मिळत आहेत.
काही खासगी व्यापारीदेखील जवसाची थेट खरेदी करीत आहेत. इतके चांगले दर असूनही पेरणी शून्यावर जाणे, ही बाब शेती व्यवस्थेतील नियोजन आणि मार्गदर्शनातील उणिवा अधोरेखित करते.
जवसासारख्या पोषक, औद्योगिक व उत्पन्न देणाऱ्या पिकाला प्रोत्साहन देण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन, खात्रीशीर बाजारभाव व शासनस्तरीय पाठबळ मिळाल्यासच शेतकरी या पिकाकडे पुन्हा वळतील, अशी अपेक्षा कृषी तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
हे ही वाचा सविस्तर :Jowar Market : लागवड खर्चही वसूल होईना; खरीप ज्वारीचे दर नीचांकावर
