सोपान कोठाळे
रात्रभर शेतात पहारा, थकवा, भीती म्हणून आता केळगावच्या शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांना रोखण्यासाठी एक भन्नाट युक्ती शोधला आहे ती म्हणजे लाऊडस्पीकर. निलगाय, रानडुक्कर, हरिण यांसारखे प्राणी मिरची, मका, सोयाबीनसारखी कोवळी पिके फस्त करत होते. (Protect Crops)
लाऊडस्पीकर हे प्रयोगशील तंत्र वापरून शेतकऱ्यांनी आता रात्र जागरणाशिवायही पिके वाचवायला सुरुवात केली आहे.(Protect Crops)
वन्यप्राण्यांच्या दहशतीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेवटी जुगाड युक्तीचा आधार घेतला आहे. सिल्लोड तालुक्यातील केळगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी निलगाई, हरिण, रानडुकरांसारख्या वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतात लाऊडस्पीकर लावण्याचा अनोखा प्रयोग सुरू केला आहे. (Protect Crops)
या स्पीकरमधून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आणि फटाक्यांच्या आवाजाचा वापर करून प्राणी पळवले जात आहेत, आणि ही शक्कल बऱ्याच अंशी यशस्वी ठरली आहे.(Protect Crops)
रात्रंदिवस शेतकऱ्यांचा आटापिटा
केळगाव, आधारवाडी, कोन्हाळा तांडा, पिंपळगाव घाट, धावडा, गोकुळवाडी आणि जाभई या गावांमध्ये मिरची, मका, सोयाबीन, वांगी यासारखी कोवळी पिके सध्या शेतात उभी आहेत.
जोरदार पावसाचा अभाव असतानाही पिके तग धरून आहेत. मात्र, जंगलात राहणाऱ्या निलगाई, हरिण, रानडुकरांचे हल्ले शेतकऱ्यांची झोप उडवत आहेत.
लाऊडस्पीकरची नवी भूमिका!
बाजारात ७०० ते ८०० रुपयांना उपलब्ध असलेले लाऊडस्पीकर शेतकरी खरेदी करून शेताच्या मध्यभागी व बांधावर लावत आहेत.
या स्पीकरमधून कुत्र्यांच्या भुंकण्याचा किंवा फटाक्यांचा आवाज सातत्याने ऐकू येतो.
त्यामुळे प्राणी गोंधळून जातात आणि पिकांपासून दूर राहतात.
जुन्या क्लृप्त्याही कायम
याशिवाय अनेक शेतकरी पिकांच्या भोवती काटेरी तारांचे कुंपण, रंगीत साड्या लावणे, माणसाचे कपडे घालून बुजगावणे उभे करणे, काचेच्या रिकाम्या बाटल्यांचा आवाज यांचा वापरही करत आहेत.
पिकांचे रक्षण करण्यासाठी रात्रभर शेतात जागून पहारा देणे, हे जसे एक टोकाचे पाऊल आहे, तसेच या शेतीतील युक्त्या 'स्थानिक संशोधन' म्हणून पाहिल्या जात आहेत.
डोंगराळ परिसरात वन्यजीवांचा वावर ठिकठिकाणी
केळगाव व आजूबाजूचा परिसर अजिंठा डोंगररांगेने वेढलेला असल्याने प्राणी वारंवार शेतात शिरतात. यामध्ये रानडुकरांचा फार मोठा त्रास असून ते एका रात्रीत संपूर्ण पीक उद्ध्वस्त करतात. त्यांच्यासोबत मोर, निलगाई, हरणांची संख्याही मोठी आहे.
दररोज रात्रभर जागून पहारा देणे अशक्य होते. लाऊडस्पीकरमुळे आता बरीचशी शांती मिळाली आहे. खर्च जास्त आहे पण पीक वाचवणं गरजेचे आहे.
शासनाच्या मदतीविना वन्यप्राण्यांविरोधात लढा देणाऱ्या शेतकऱ्यांनी आता स्वतः च युक्त्या लढवायला सुरुवात केली आहे. लाऊडस्पीकर, पुतळे, साड्या, काटेरी तार, बाटल्या ही सगळी उपाययोजना म्हणजे शेतकऱ्यांची जिद्द आणि सर्जनशीलता दर्शवते.