Power Tiller : अकोला जिल्ह्यात मजूरटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना कृषी यांत्रिकीकरण शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. (Power Tiller)
त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने ९० टक्के अनुदानावर ४७ पॉवर टिलरचे वितरण केले असून या यंत्रामुळे तण नियंत्रण, मातीची भुसभुशीतता आणि उत्पादनक्षमतेत मोठी सुधारणा दिसून येत आहे. (Power Tiller)
कमी खर्चात, कमी वेळात आणि कमी मजुरांवर अवलंबून राहून शेतीची कामे पूर्ण करण्यासाठी पॉवर टिलर गेम चेंजर ठरत आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना वेळ, श्रम आणि खर्च तिन्हीची मोठी बचत होत आहे.(Power Tiller)
शेतकऱ्यांसाठी पॉवर टिलर ठरतंय 'गेम चेंजर'
पॉवर टिलरचा वापर केल्याने तण काढण्याचे काम अतिशय सोपे आणि वेगवान झाले आहे. विशेषतः फळबागा, भाजीपाला, ऊस, कडधान्ये, तसेच विविध पिकांमध्ये तण नियंत्रणासाठी हे यंत्र अत्यंत उपयुक्त ठरत आहे. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत एका व्यक्तीलाच मोठ्या क्षेत्रातील तण सहज काढता येत असल्याने मजुरांची आवश्यकता लक्षणीय प्रमाणात कमी झाली आहे.
पॉवर टिलरमुळे तणनाशक फवारणीची गरज कमी झाली असून त्यामुळे रासायनिक खर्चही वाचतो. शेतकऱ्यांचा एकूण उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात घटतो.- सुनंदा दळवी, कृषी अधिकारी
मृदा आरोग्यातही सुधारणा
पॉवर टिलर केवळ तण काढण्यासाठीच नव्हे, तर मातीच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
यंत्र चालवल्यावर माती अधिक भुसभुशीत होते
मुळांना ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो
पाण्याची मुरणक्षमता सुधारते
पिकांची वाढ जलद आणि निरोगी होते
परिणामी उत्पादनातही निश्चित वाढ दिसून येते.
अनुदानामुळे शेतकऱ्यांचा दिलासा
जिल्हा परिषद सेस फंडातून दिल्या जाणाऱ्या ९०% अनुदानामुळे या महागड्या यंत्राची खरेदी शेतकऱ्यांसाठी सुलभ झाली आहे. सामान्य शेतकऱ्यालाही पॉवर टिलर घेणे आर्थिकदृष्ट्या सहज शक्य झाले आहे.
काम दुपटीने सुकर
पॉवर टिलर आल्यापासून शेतातील कामे अधिक सोपी झाली आहेत. मातीतील फंगस निघून जातो, ऑक्सिजन वाढल्याने पिकांची वाढ चांगली होते. तण काढण्यासाठी मजूर मिळत नसतानाही आम्ही वेळेत शेतीची कामे करू शकतो.- सतीश भटकर ,युवा शेतकरी
अनेक शेतकऱ्यांनीही या यंत्राचा वापर मोठा दिलासा असल्याचे सांगितले.
तणावर नियंत्रण
अकोला जिल्हा परिषदेमुळे शेतकऱ्यांकडे आता कार्यक्षम, कमी खर्चिक आणि उत्पादनक्षम साधन उपलब्ध झाले आहे. मजुरांवरील अवलंबित्व कमी झाल्याने शेती वेळेत आणि सुस्थितीत पार पडण्यास मोठी मदत होते आहे.
