विजय जाधव
कमी कालावधीत येणारे आणि नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे बटाटा पीक यंदा मात्र उत्पादक शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत बटाट्याला समाधानकारक दर मिळत असताना, यंदा मात्र बाजारभाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.(Potato Cultivation)
वैजापूर तालुक्यातील गोंदगाव येथील शेतकरी भाऊसाहेब सामृत यांना बटाटा लागवडीत थेट आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे.(Potato Cultivation)
अर्धा एकरात बटाटा, पण हाती निराशा
भाऊसाहेब सामृत यांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये त्यांच्या शेतातील अर्धा एकर क्षेत्रात बटाट्याची लागवड केली होती.
या पिकासाठी त्यांनी मंचर (ता. सिन्नर) येथून ३ क्विंटल बटाटा बियाणे खरेदी केले. सुमारे अडीच महिने त्यांनी स्वतः आणि कुटुंबीयांच्या मदतीने दिवसरात्र मेहनत घेत पीक जोपासले. महागडी खते, रासायनिक औषधे, फवारणी आणि मजुरी यावर मोठा खर्च केला.
पीक जोमदार येत अर्धा एकरातून तब्बल २३ क्विंटल बटाट्याचे उत्पादन मिळाले. मात्र, बाजारात दर कोसळल्याने त्यांना केवळ ९ रुपये किलो असा अत्यंत कमी भाव मिळाला.
खर्च जास्त, उत्पन्न कमी
या बटाटा पिकासाठी शेतकरी सामृत यांना एकूण २१ हजार ३०० रुपये खर्च आला. मात्र, संपूर्ण उत्पादन विक्रीतून त्यांना केवळ २० हजार ७०० रुपये मिळाले. परिणामी त्यांना ६०० रुपयांचा थेट तोटा सहन करावा लागला. खर्चही पूर्णपणे न निघाल्याने त्यांची तसेच कुटुंबीयांची मेहनत अक्षरशः वाया गेली.
अर्धा एकर बटाटा पिकाचा खर्च (रु.)
बियाणे (३ क्विंटल) – ३,३००
रोटावेटर – १,०००
खते – ८,५००
फवारणी – २,०००
मजुरी – ६,०००
वाहतूक – ५००
एकूण लागवड खर्च – २१,३०० रुपये
मिळालेले उत्पादन
एकूण उत्पादन : २३ क्विंटल
मिळालेला दर : ९ रुपये प्रति किलो
एकूण उत्पन्न : २०,७०० रुपये
अपेक्षा : २०-२५ रुपये
तोटा किती?
थेट आर्थिक तोटा : ६०० रुपये
स्वतःची व कुटुंबाची मेहनत : पूर्णपणे वाया
जोखीम व कालावधीचा मोबदला : शून्य
बटाट्याला किमान २० ते २५ रुपये किलो दर मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र प्रत्यक्षात बाजारात केवळ ९ रुपये किलो दर मिळाल्याने मोठा धक्का बसला.
अतिवृष्टीमुळे आधीच शेतीचे नुकसान झाले असताना, त्यातच बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे.
एकीकडे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले, तर दुसरीकडे बाजारभाव कोसळले. केवळ खर्च निघावा एवढीही हमी नसेल, तर शेती कशी करायची? शासनाने प्रत्येक शेतमालाला किमान हमीभाव जाहीर करावा, म्हणजे शेतकऱ्यांचे कष्ट वाया जाणार नाहीत. - भाऊसाहेब सामृत, शेतकरी
मी गेल्या अनेक वर्षांपासून थेट शेतात जाऊन शेतमाल खरेदी करतो. मात्र, आतापर्यंत प्रथमच असे घडले की बटाटा पीक शेतकऱ्यांना मोठ्या तोट्यात विकावे लागले. एवढा कमी दर यापूर्वी कधीच पाहायला मिळाला नाही. - जलील शहा, व्यापारी
शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले
यंदा अतिवृष्टी, वाढलेला उत्पादन खर्च आणि त्यातच बाजारातील घसरलेले दर यामुळे बटाटा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.
उत्पादन चांगले असूनही योग्य दर न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नसल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.
