धाराशिव : केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत राबविण्यात येत असलेली पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (PMFME) योजना धाराशिव जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलात येत असून, या योजनेमुळे उद्योग उभारणीचा मार्ग आता अधिक सुलभ झाला आहे. (PMFME Scheme)
जिल्ह्यातील वाढती बेरोजगारी लक्षात घेता सुशिक्षित युवक, बचत गट, शेतकरी गट आणि विविध संस्थांना उद्योग उभारण्यासाठी भांडवलाची अडचण भासत होती. (PMFME Scheme)
मात्र, या योजनेमुळे ती अडचण दूर होत असून एकूण ४८१ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी ३८५ सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग प्रत्यक्ष सुरू झाले आहेत.(PMFME Scheme)
या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पात्र लाभार्थ्यांना एकूण कर्जाच्या ३५ टक्के रक्कम सबसिडी (अनुदान) स्वरूपात दिली जाते. या आर्थिक प्रोत्साहनामुळे जिल्ह्यातील अनेक बेरोजगार युवक, महिला बचत गट, शेतकरी गट, संस्था तसेच अॅग्रो कंपन्यांना उद्योग सुरू करण्यास मोठा हातभार लागला आहे. (PMFME Scheme)
विशेष म्हणजे, अर्जदाराकडे सात-बारा नसले तरीही या योजनेचा लाभ घेता येतो, ही बाब अनेकांसाठी दिलासादायक ठरत आहे.
विविध अन्नप्रक्रिया उद्योगांना चालना
चालू आर्थिक वर्षात (२०२४–२५) मंजूर झालेल्या प्रस्तावांमधून जिल्ह्यात खवा उद्योग, गूळ उद्योग, डाळ प्रक्रिया उद्योग, बेदाणा (किसमिस), मसाले, पापड निर्मिती अशा विविध अन्नप्रक्रिया उद्योगांची उभारणी झाली आहे. यामुळे स्थानिक पातळीवर कच्च्या मालावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन होत असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. तसेच ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला चालना मिळत आहे.
असंघटित उद्योगांसाठी सुवर्णसंधी
पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना ही प्रामुख्याने असंघटित व अनोंदणीकृत अन्नप्रक्रिया उद्योगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तयार करण्यात आली आहे. कच्च्या मालावर प्रक्रिया करून थेट बाजारात विक्री केल्यास अधिक नफा मिळू शकतो, यासाठी शासनाकडून ही योजना मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे.
धाराशिव जिल्ह्यात कच्च्या मालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असले, तरी त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग तुलनेने कमी आहेत.
ही बाब लक्षात घेता ग्रामीण भागातील युवक, महिला बचत गट आणि शेतकरी गटांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी सांगितले. जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
अर्ज कसा करावा?
इच्छुक अर्जदारांनी www.pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज दाखल करण्यापासून ते मंजुरीपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत मोफत मार्गदर्शन उपलब्ध असून, यासाठी प्रत्येक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मानधन तत्त्वावर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. उद्योग सुरू झाल्यानंतर शासनाकडून पात्र लाभार्थ्यांना ३५ टक्के अनुदान प्रदान करण्यात येते.
ही योजना धाराशिव जिल्ह्यातील उद्योगक्षेत्रासाठी नवसंजीवनी ठरत असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी ठरत आहे.
हे ही वाचा सविस्तर : PMFME Scheme: 'पीएमएफएमई' योजनेत पाटणा अव्वल; संभाजीनगरची कामगिरी का घसरली?
