गजानन मोहोड
केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' (PM Kisan) योजनेचा २१ वा हप्ता बुधवारी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. (PM Kisan Update)
राज्यातील ९० लाखा ४१ हजार २४१ शेतकरी योजनेसाठी पात्र असून त्यांच्या खात्यात १८०८.२५ कोटी रुपये जमा केले जाणार असल्याची माहिती अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. (PM Kisan Update)
२० व्या हप्त्याच्या तुलनेत तब्बल ६ लाख ९ हजार ९३० शेतकरी योजनेतून बाद झाले आहेत.(PM Kisan Update)
२० व्या हप्त्याच्या तुलनेत लाभार्थी कमी – काय कारण?
२ ऑगस्ट २०२५ रोजी वितरित केलेल्या २० व्या हप्त्यात ९६ लाख ५१ हजार १७१ शेतकऱ्यांना निधी मिळाला होता. मात्र, नव्या निकषांमुळे यावेळी लाभार्थी संख्या कमी होऊन ९० लाख ४१ हजार २४१ वर आली आहे.
केंद्राने अलीकडेच पीएम किसान योजनेत अनेक नवे फिल्टर आणि पात्रता तपासणी प्रक्रिया जोडल्या आहेत. यात आधार लिंकिंग, KYC, जमीन नोंदणी पडताळणी, डुप्लिकेट लाभधारक तपासणी यांचा समावेश आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात 'नॉन-एलिजिबल' आणि डुप्लिकेट नोंदी आढळल्या.
नवीन निकषांमुळे घडलेले बदल
* एका कुटुंबातील फक्त एकालाच लाभ
* पीएम किसान योजनेनुसार पती, पत्नी आणि १८ वर्षांखालील मुलांचा एकत्र विचार 'एक कुटुंब' या संकल्पनेत केला जातो.
परंतु काही ठिकाणी
पती व पत्नी दोघांनीही नोंदणी केली
किंवा मुलांच्या नावावरही शेतजमीन असल्याने त्यांनाही लाभ मिळत होता
ही बाब केंद्राच्या निदर्शनास आली आणि डुप्लिकेट व अनधिकृत लाभ रोखण्यासाठी तपासणी मोहीम राबविण्यात आली.
डुप्लिकेट नोंदी थेट रद्द
ज्या कुटुंबात एकापेक्षा जास्त नोंदणी आढळल्या त्या प्रकरणात
* पतीचा हप्ता बंद
* पत्नीला लाभ देण्याची नवीन पद्धत लागू
यामुळे मोठ्या प्रमाणावर पुनर्पडताळणी झाली आणि हजारो लाभार्थी बाद झाले.
जमीन नोंदीतील विसंगती
ई-क्रॉप, भू-अभिलेख, पीकपेरणी तपशील जुळत नसल्याने अनेक लाभार्थी तांत्रिक त्रुटींमुळे अपात्र ठरले.
आकडेवारी एक नजरात
| तपशील | २० वा हप्ता | २१ वा हप्ता |
|---|---|---|
| पात्र खातेदार | ९६,५१,१७१ | ९०,४१,२४१ |
| वितरित/आवश्यक निधी | १९३०.२३ कोटी | १८०८.२५ कोटी |
| घटलेले लाभार्थी | — | ६.१० लाखांनी घट |
२१ वा हप्ता जमा झाल्यानंतरच अंतिम आकडे
पोर्टलवरील पात्रता सूची प्राथमिक असून प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली यावरून अंतिम लाभार्थी संख्या समोर येणार आहे.
शेतकऱ्यांसाठी यातून काय धडा?
KYC वेळेवर पूर्ण करणे अत्यावश्यक
जमीन नोंदी (७/१२, फेरफार) अद्ययावत ठेवणे गरजेचे
डुप्लिकेट अर्ज केल्यास योजनेतून कायमची वगळणी शक्य
बँक खाते, आधार, मोबाईल तपशील एकसारखे ठेवणे आवश्यक
राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मिश्र प्रतिक्रिया
मोठ्या प्रमाणात शेतकरी बाद झाल्याने काही भागात नाराजी व्यक्त होत आहे. परंतु केंद्र शासनाच्या म्हणण्यानुसार, 'केवळ पात्र व खऱ्या शेतकऱ्यांनाच लाभ देण्यासाठी' ही कडक अंमलबजावणी सुरू केली आहे.
