PM Kisan Scheme : शेतकऱ्यांना 'पीएम किसान' आणि 'नमो शेतकरी' योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित असताना, तलाठ्याच्या प्रशासकीय चुकीमुळे हे अनुदान चक्क चंद्रपूर जिल्ह्यात वर्ग झाले. अतिवृष्टीने आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर या चुकीमुळे नवे आर्थिक संकट ओढवले असून, प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (PM Kisan Scheme)
हदगाव तालुक्यातील तालंग गावातील तब्बल २०७ शेतकऱ्यांचे 'पीएम किसान सन्मान' योजनेचे अनुदान चक्क चंद्रपूर जिल्ह्यात वर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (PM Kisan Scheme)
तलाठ्याच्या प्रशासकीय चुकीमुळे तालंग येथील शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित राहिले असून, या प्रकारामुळे शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.(PM Kisan Scheme)
'जे ब्रह्मदेव न करी ते पटवारी करी' ही म्हण तालंग गावातील शेतकऱ्यांना अक्षरशः अनुभवावी लागत आहे. (PM Kisan Scheme)
मागील वर्षी अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक गावांतील खरीप पिके पूर्णतः उद्ध्वस्त झाली. नदीकाठच्या गावांतील शेतकऱ्यांचे तर मोठे नुकसान झाले.
यानंतर मंत्री व लोकप्रतिनिधींनी पाहणी दौरे करून मदतीचे आश्वासन दिले; मात्र आठ महिने उलटूनही प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या पदरात पडलेली नाही.
दरम्यान, केंद्र सरकारची 'पीएम किसान सन्मान योजना' आणि राज्य सरकारची 'नमो शेतकरी सन्मान योजना' या दोन्ही योजनांमधून शेतकऱ्यांना वर्षाकाठी प्रत्येकी सहा हजार रुपये, असे एकूण बारा हजार रुपये मिळतात. सुरुवातीला दोन हेक्टर जमिनीची अट होती; मात्र ती अट रद्द करण्यात आल्याने सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे.
तालंग येथील २०७ शेतकऱ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह तलाठ्याकडे ऑफलाइन अर्ज सादर केले होते. मात्र, नोंदणी करताना झालेल्या चुकांमुळे या शेतकऱ्यांचे अनुदान नांदेडऐवजी चंद्रपूर जिल्ह्यात वर्ग झाले. परिणामी, संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर एकाही हप्त्याची रक्कम जमा झालेली नाही.
या अन्यायाविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी खासदार नागेश आष्टीकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. खासदारांनी तातडीने संबंधित विभागाकडे चौकशी करून चूक दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, दोषी तलाठ्यावर कारवाई करावी, अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे आणि शेतकऱ्यांना झालेल्या मानसिक व आर्थिक त्रासाची भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
हे ही वाचा सविस्तर : PMFME Scheme : उद्योग उभारणी आता सोपी; खवा, गूळ, डाळ उद्योगांना मिळणार चालना वाचा सविस्तर
अधिक वाचा : Shet Pandan Raste Yojana : शेतकऱ्यांना दिलासा! शेत-पांदण रस्त्यांसाठी शासनाचा नवा फॉर्म्युला वाचा सविस्तर
