शरद वाघमारे
नांदेड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी अभिमानास्पद बातमी आहे. येत्या ११ नोव्हेंबर रोजी ‘पंतप्रधान धन, धान्य, कृषी योजना’ या नव्या योजनेचा शुभारंभ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून, या सोहळ्यात नांदेड जिल्ह्यातील दोन मान्यवरांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली आहे. (PM Dhan Dhanya Krishi Yojana)
या संवादासाठी निवड झालेल्यांमध्ये विज्ञान केंद्र, नांदेड येथील कृषी तज्ज्ञ प्रा. संदीप जायभाये आणि अर्धापूर तालुक्यातील कृषिभूषण भगवान इंगोले यांचा समावेश आहे. (PM Dhan Dhanya Krishi Yojana)
विशेष म्हणजे, या कार्यक्रमादरम्यान भगवान इंगोले स्वतः उत्पादित केलेली सेंद्रिय हळद पंतप्रधान मोदींना भेट म्हणून देणार आहेत म्हणजेच नांदेडची हळद थेट पंतप्रधानांच्या स्वयंपाकघरात पोहोचणार आहे. (PM Dhan Dhanya Krishi Yojana)
काय आहे ‘पंतप्रधान धन, धान्य, कृषी योजना’?
ही योजना शेतकऱ्यांसाठी संजीवनीसमान ठरणार असून तिचा उद्देश शेती उत्पादनक्षमता वाढवणे, पिकांमध्ये विविधता आणणे, सिंचन व साठवण क्षमता सुधारणे आणि शेतकऱ्यांना आवश्यक कर्जसहाय्यता देणे हा आहे.
योजना नीती आयोगाच्या जिल्हा कार्यक्रमावर आधारित असून पहिल्या टप्प्यात देशातील १०० जिल्ह्यांत राबविण्यात येणार आहे.
विषमुक्त शेतीचा आदर्श
अर्धापूर तालुक्यातील मालेगावचे कृषिभूषण भगवान इंगोले हे सेंद्रिय पद्धतीने शेती करणारे प्रगतिशील शेतकरी आहेत. त्यांनी हळद, तूर, सोयाबीन आदी पिकांमध्ये विषमुक्त शेतीचा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या सेंद्रिय पद्धतीच्या हळदीला राज्यभरात प्रचंड मागणी आहे. हीच हळद आता पंतप्रधान मोदींना भेट दिली जाणार असल्याने नांदेड जिल्ह्याचा गौरव अधिकच वाढला आहे.
शेतीत रासायनिक खतांचा अतिरेक झाल्याने जमिनीची सुपीकता कमी होते आणि आरोग्यावरही दुष्परिणाम होतो. त्यामुळे विषमुक्त नैसर्गिक शेती करणे ही काळाची गरज आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे बळ मिळेल. पंतप्रधान मोदींशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने हा क्षण अभिमानास्पद आहे.
नांदेडचा गौरव
या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील शेती, कृषी नवकल्पना आणि शाश्वत शेतीच्या दिशेने होणाऱ्या प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. हळदीचा सुवास आता देशाच्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंत पोहोचणार, हे जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी गौरवास्पद आहे.