Pik Vima Yojana : खरीप हंगाम २०२५ मध्ये अतिवृष्टी, संततधार पाऊस, कीड व रोगराईमुळे जिल्ह्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.(Pik Vima Yojana)
या पार्श्वभूमीवर पीकविमाधारक शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या आधारे सरसकट नुकसानभरपाई देण्यात येईल, अशी घोषणा शासनस्तरावरून करण्यात आली होती. (Pik Vima Yojana)
मात्र, वर्ष संपून नववर्ष सुरू झाले तरी जिल्ह्यातील तब्बल १ लाख २९ हजार १४२ शेतकरी आजही पीकविम्याच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.(Pik Vima Yojana)
'आज नाही तर उद्या विम्याची रक्कम खात्यात जमा होईल,' या अपेक्षेवर २०२५ सरले असून, नववर्षात तरी पीकविम्याचा लाभ मिळणार का? असा प्रश्न आता शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. (Pik Vima Yojana)
जिल्ह्यात १.९८ लाख हेक्टरवरील पिकांचा विमा
खरीप हंगामात वाशिम जिल्ह्यातील १ लाख २९ हजार १४२ शेतकऱ्यांनी १ लाख ९८ हजार ३११ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविला होता.
सोयाबीन, कापूससह इतर पिकांवर अतिवृष्टी व पावसाच्या सलग सरींमुळे गंभीर परिणाम झाला. अनेक ठिकाणी पिके आडवी पडली, कुजली किंवा पूर्णतः नष्ट झाली.
या पार्श्वभूमीवर विमाधारक शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या आधारे भरपाई दिली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात अद्यापही भरपाईचा ठोस निर्णय अमलात आलेला नसल्याने शेतकऱ्यांची निराशा वाढत आहे.
तालुकानिहाय विमाधारक शेतकऱ्यांची संख्या
जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे.
वाशिम : २३,५७६
कारंजा : २०,३४५
मालेगाव : २१,७८१
मंगरुळपीर : २०,४६८
मानोरा : १८,०६८
रिसोड : २४,९०४
यापैकी रिसोड तालुक्यात सर्वाधिक विमाधारक शेतकरी असून, या तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
जिल्हास्तरीय यंत्रणेलाही सूचना नाहीत
उत्पन्नाच्या आधारे पीकविमा भरपाई देण्याबाबत शासनस्तरावरून घोषणा झाली असली, तरी जिल्हास्तरीय यंत्रणा आणि संबंधित विमा कंपनीच्या प्रतिनिधींना अद्याप कोणत्याही स्पष्ट सूचना मिळालेल्या नाहीत, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष भरपाई प्रक्रिया कधी सुरू होणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे.
शेतकऱ्यांचा वाढता रोष
एकीकडे खरीपातील नुकसान, दुसरीकडे रब्बी हंगामाचा खर्च आणि घरखर्च यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
पीकविम्याची रक्कम वेळेत मिळाली असती तर मोठा दिलासा मिळाला असता, अशी भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
'विमा भरला, नुकसानही झाले; पण भरपाईच मिळत नसेल तर योजनेचा उपयोग काय?' असा सवाल अनेक शेतकरी करत आहेत.
नववर्षात तरी दिलासा मिळेल का?
२०२५ संपूनही पीकविम्याची प्रतीक्षा कायम असल्याने आता नववर्षात तरी शासनाने तातडीने निर्णय घेऊन विम्याची रक्कम खात्यात जमा करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा पीकविमा योजनेवरील शेतकऱ्यांचा विश्वास डळमळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
