नाशिक : पीक विमा योजनेत (Pik Vima Yojana) अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली, तर काही शेतकरी आजही प्रतीक्षेत आहेत. या दरम्यान एक चांगली गोष्ट समोर आली आहे. येवला तालुक्यातील (Yeola) शेतकऱ्याच्या खात्यावर चुकून दुसऱ्या शेतकऱ्याच्या पिकविम्याचे आले. संबंधित शेतकऱ्याच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या शेतकऱ्याची संपर्क साधून रक्कम परत केली आहे. शेतकऱ्याचे या प्रामाणिकपणाचे चांगलेच कौतुक होत आहे.
राज्यात पीक विमा योजनेत (Pik Vima Yojana) अनेक शेतकरी सहभागी होतात. शिवाय शेतीचे नुकसान झाल्यानंतर त्याची भरपाई मिळते. तर यंदाच्या खरीप हंगामात तर पीक घोटाळा चांगलाच गाजला. अनेक पिकांच्या बाबतीत तो समोरही आला. त्यानंतर रब्बी हंगामातील (rabbi Season) पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज केले आहे. या पीक विमा योजनेबाबत एक सुखावह घटना समोर आली आहे. नेमकं काय घडलं ते पाहुयात....
खरीप हंगाम २०२३ मधील पीक विमा योजनेत अनेक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. याचवेळी येवला तालुक्यातील सायगाव येथील शेतकरी गंगाधर कुळधर हे देखील पिक विमा भरत होते. पीक विम्याचा अर्ज भरत असताना आधार नंबर व्हेरिफाय करताना मिसमॅच झाला. म्हणजेच बँकेला जो आधार नंबर लिंक होता तो पीक विमा भरत असताना पीक विम्याची पावती व्हेरिफाय करताना चूक झाली. ही गोष्ट पिक विमा जमा झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आली. त्यावेळी त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय येवला येथे व पिक विमा कंपनी प्रतिनिधी बाजीराव पाचपुते यांच्याकडे संपर्क साधला.
दरम्यान तपासणीनंतर तो आधार नंबर लिंक बँक खाते नंबर येवला तालुक्यातीलच आडगाव चोथवा येथील शेतकरी बाळासाहेब काशीनाथ खोकले यांचा असल्याचे आढळून आले. त्यावेळी विमा कंपनी प्रतिनिधी व कृषि सहाय्यक सोनाली कदम यांनी खोकले यांना संपर्क साधला. यावेळी ते धार्मिक यात्रेनिमित्त बाहेरगावी होते. पण तेथून परतल्यानंतर बॅंक खात्यात जमा झालेल्या रक्कमेची शहानिशा केली. रक्कम आपली नसुन दुसऱ्या शेतकऱ्याची आहे, हे लक्षात येताच त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला. आणि तात्काळ चुकून आलेले 43 हजार 2 9 रुपये संबंधित कुळधर या शेतकऱ्याला ऑनलाईन जमा केले.
यावेळी शेतकरी गंगाधर कुळधर यांनी बाळासाहेब खोकले यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली. पिक विमा कंपनीकडून देखील त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी संजय सुर्यवंशी, तालुका कृषि अधिकारी शुभम बेरड यांनी कृषि विभागाच्या वतीने शेतकरी बाळासाहेब खोकले यांचे विशेष आभार मानले.
नर्मदा परिक्रमा यात्रेला गेलो असताना शेतकऱ्याचा कॉल आला होता. यात्रेच्या गडबडीत असल्याने काही लक्षात आले नाही. घरी आल्यानंतर पुन्हा त्यांच्याशी संपर्क करत तात्काळ पैसे परत केले. त्यांनी देखील समाधान व्यक्त केले. मी फक्त माझं काम केले. शेतकऱ्याला त्याचे पैसे मिळाले, त्यावेळचा आनंदत्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.
- बाळासाहेब खोकले, येवला