Agriculture News : नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथील कांदा व द्राक्ष संशोधन केंद्राच्या बळकटीकरणासोबतच राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत किटकनाशक अवशेष चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक घेण्यात आली.
नाशिक जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, चांदवड, बागलाण, देवळा व मालेगाव या तालुक्यांत द्राक्ष, बेदाणे, डाळिंब, टोमॅटो आणि कांदा या निर्यातक्षम पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. पिंपळगाव बसवंत हे या उत्पादन पट्ट्याच्या मध्यभागी असून द्राक्ष निर्यातदारांचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. सध्या येथील शेतकरी व निर्यातदारांना किटकनाशक अवशेष तपासणीसाठी खाजगी प्रयोगशाळांवर अवलंबून राहावे लागते.
पिंपळगाव बसवंत येथे कृषी विद्यापीठाचे संशोधन केंद्र व उपलब्ध जागा असल्यामुळे प्रयोगशाळा उभारणीसाठी हे ठिकाण योग्य व सोयीचे असल्याचे श्री.भरणे यांनी सांगितले. तसेच निर्यातक्षम कृषी मालाच्या तपासणीसाठी अत्याधुनिक सुविधा, आवश्यक मानांकन आणि सर्व सोयींनी युक्त प्रयोगशाळा उभारण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असेही त्यांनी निर्देश दिले.
प्रयोगशाळेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि सुविधा:
उद्देश : फळे, भाजीपाला आणि कृषी मालातील कीटकनाशकांचे अवशेष, जड धातू आणि अन्न गुणवत्ता तपासणे.
तंत्रज्ञान : NABL मान्यताप्राप्त असून, GC/MS/MS आणि LC/MS/MS यांसारख्या प्रगत उपकरणांद्वारे अचूक तपासणी.
फायदा : शेतकरी आणि निर्यातदारांना जागतिक मानकांनुसार (FSSAI, APEDA) मालाची गुणवत्ता तपासणी मिळण्यास मदत.
उपलब्धता : प्रामुख्याने द्राक्ष आणि कांदा यांसारख्या प्रमुख पिकांसाठी ही प्रयोगशाळा उपयुक्त ठरेल.
या बैठकीत प्रस्तावित प्रयोगशाळेच्या उभारणीसंदर्भातील तांत्रिक बाबी, आवश्यक पायाभूत सुविधा, मनुष्यबळ नियोजन, प्रशासकीय प्रक्रिया तसेच निधी उपलब्धतेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला आमदार दिलीपराव बनकर उपस्थित होते.
