नाशिक : शेतकऱ्यांना कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधाताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी कृषी विभागाने (Agriculture Department) कृषी अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी कायमस्वरूपी मोबाईल क्रमांक सेवा 1 नाव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
शासनाचा एक महत्वपूर्ण निर्णय असून 1 नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व कृषी यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांना कायमस्वरूपी मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिले जाणार असून 1 नाव्हेंबरनंतर ते सर्व ठिकाणी प्रसिद्ध केले जातील. या निर्णयानुसार संबंधित अधिकारी / कर्मचारी यांची बदली झाल्यानंतर त्यांचा तोच मोबाईल क्रमांक थेट नवीन अधिकारी/ कर्मचारी यांच्याकडे हस्तांतरीत केला जाणार आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी , उपकृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी या पदांसाठी हा निर्णय लागू होणार आहे. यासाठी जिओ कंपनीचे पोस्टपेड सीमकार्ड देण्यात येणार असून दर महिन्याला 60 जीबी डेटा, अमार्यादित कॉल आणि 3 हजार एसएमएस ची सुविधा मिळणार असून हा प्लॅन कृषी विभागामार्फत थेट नियंत्रित केला जाणार आहे. हा मोबाईल क्रमांक केवळ शासकीय कामासाठीच वापरता येणार आहे. वैयक्तिक कामासाठी (उदा. गुगल पे, फोन पे, बँकींग व्यवहार) यासाठी सीमचा वापर करण्यास प्रतिबंध आहे.
शेतकऱ्यांना होणारा फायदा
या सुविधेमुळे अधिकारी किंवा कर्मचारी यांची बदली झाली, तरी त्यांचा मोबाईल क्रमांक बदलणार नाही. यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक असलेली माहिती, मार्गदर्शन आणि संपर्क कायमस्वरूपी उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजना, तंत्रज्ञान आणि हवामानविषयक माहिती तत्काळ मिळण्यास मदत होणार आहे.
तसेच तक्रारी नोंदविणे किंवा अडचणी मांडणे अधिक सोपे होवून तक्रार निवारण प्रणाली अधिक प्रभावी होणार आहे. शेतकऱ्यांना पीक सल्ला, किड-रोग व्यवस्थापन किंवा कोणत्याही कृषी विषयक समस्येवर अधिकाऱ्यांचे सातत्यपूर्ण मागदर्शन उपलब्ध होणर आहे. अधिकारी/ कर्मचारी बदलल्यास नवीन नंबरची अडचण दूर होणार असून वेळ वाचणार आहे. या निर्णयामुळे शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यातील समन्वय दृढ होणार आहे.
