Papaya Farming : एकीकडे थंडी, गारठा, दुसरीकडे अवकाळी पाऊस (Rain) यामुळे पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. फळ पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी शेतकऱ्यांकडून विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. धुळे जिल्ह्यातील (Dhule District) नेर येथील शेतकरी सुरेश पाटील यांनी आपल्या पपईच्या झाडांना साड्यांचे संरक्षण दिले आहे.
धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण (Cloudy Weather) निर्माण झाल्याने याचा फटका रब्बी हंगामाच्या पिकांना बसताना पाहायला मिळत आहे. तसेच दुसरीकडे फळबागांना देखील याचा फटका बसत आहे. शिवाय वातावरणातील बदलामुळे फळ पिकावर व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. फळ पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी शेतकऱ्यांकडून विविध उपाय योजना करण्यात येत आहेत.
धुळे तालुक्यातील नेर येथील शेतकरी सुरेश पाटील यांनी आपल्या पपईच्या झाडांना (Papai Tree) साड्यांचे संरक्षण दिले आहे. जवळपास 5000 पपईच्या झाडांची त्यांनी लागवड केली आहे, मात्र वातावरण बदलामुळे पपई फळावर काळे चट्टे पडण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर संतोष पाटील यांनी पपईच्या झाडांना साड्यांचा आधार देत संरक्षण केले जात आहे. वातावरण बदलामुळे उत्पन्न देखील कमी येणार असून यंदा 75 टक्के नुकसान झाल्याची प्रतिक्रिया शेतकरी सुरेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.
पपईला बाजारभाव नाही
धुळ्यासह उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पपईची लागवड केली जाते. सध्या गारठा, थंडी आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसत असल्याने पपईवर काळे चट्टे पडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. यापासून संरक्षण मिळण्यासाठी तसेच फळ सुस्थितीत असावे व चांगले उत्पादन मिळावे, यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयत्न होत आहेत. बहुतांश शेतकरी फळांना कापड व कागदाचे आवरण लावतात. या शेतकऱ्याने साड्यांचे आवरण लावले आहे. मात्र गारठा असल्याने पपईला उठाव नसून अपेक्षित बाजारभाव देखील नसल्याने तोटा सहन करावा लागत असल्याची खंत शेतकऱ्याने बोलून दाखवली.