राहुल पेटकर
जुलै महिना संपत आला तरी पावसाचा पुरेसा जोर नसल्याने धान उत्पादकांची चिंता वाढली आहे. पन्ह्यांतील रोपे पिवळी पडत असून पाण्याअभावी रोवण्या रखडल्या आहेत. सिंचनाची सोय नसलेल्यांना आता पेंचच्या पाण्यावरच आशा आहे.(Paddy Plantation)
जुलै महिना संपत आला तरी रामटेक तालुक्यात चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. (Paddy Plantation)
कोरड्या हवामानामुळे धानाच्या पन्ह्यांमधील रोपटी पिवळी पडू लागली असून, पाणी नसल्यामुळे रोवण्या रखडल्या आहेत.(Paddy Plantation)
सिंचनाची सोय नसलेल्या बहुतांश शेतकऱ्यांना आता पावसाच्या प्रतीक्षेत बसावं लागत आहे.(Paddy Plantation)
पावसाचा खंड; रोपटी धोक्यात
रामटेक तालुक्यात १ जून ते २० जुलैपर्यंत केवळ ३५६.७ मिमी पाऊस झाला आहे. त्यातही सुरुवातीला मे महिन्यात थोडाफार पाऊस झाला होता, पण मृग नक्षत्र कोरडे गेले.
८ ते १० जुलैदरम्यान काही भागात जोरदार पाऊस झाला, त्यावेळी पन्ह्यांमध्ये रोपटी तयार झाली. मात्र, त्यानंतर पुन्हा पाऊस गायब झाला.
ज्यांनी उशिरा पन्हे टाकली, त्यांची रोपटी अद्याप रोवणीयोग्य झाली नाहीत. तर, ज्यांची रोपटी तयार आहेत त्यांच्यावर पाणी नसल्याने रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.
रोवण्या केवळ १० टक्क्यांवर
कृषी विभागाने यंदा रामटेक तालुक्यात २२ हजार ८५१ हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड होईल, असा अंदाज व्यक्त केला होता.
मात्र, जुलै संपायला येऊनही केवळ १० टक्केच रोवण्या पूर्ण झाल्या आहेत. यावेळी साधारण ६० टक्क्यांपर्यंत रोवण्या व्हायला हव्या होत्या.
असमान पावसामुळे परिस्थिती बिघडली
तालुक्याच्या देवलापार भागात मध्यरात्री पावसाची झड बसली, त्यामुळे तिथे थोड्याफार प्रमाणात रोवण्या सुरू झाल्या आहेत. मात्र, नगरधन, मुसेवाडी व रामटेक मंडळात पावसाचा जोर कमीच राहिला आहे.
महादुला, पंचाळा, शिवनी परिसरातील नाल्यांमध्ये पाणी असल्याने काही शेतकऱ्यांनी मोटारपंप लावून पाणी उचलून रोवण्या सुरू केल्या आहेत. मात्र, ही सुविधा सर्वांना परवडणारी नाही.
पेंचच्या पाण्याची मागणी
नगरधन व आसपासच्या काही गावांना पेंच प्रकल्पातून सिंचनाचे पाणी मिळते. मात्र, ते अद्याप सोडलेले नाही. त्यामुळे पेंचचे पाणी तातडीने कालव्यात सोडावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
तज्ज्ञांचा इशारा
३१ जुलैपर्यंत रोवण्या पूर्ण न झाल्यास धानावर किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. परिणामी उत्पादनात घट व खर्चात वाढ होते, असा इशारा कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.