Join us

नाशिक जिल्ह्यात सततच्या पावसामुळे पेरण्यांना विलंब, भातासह इतर पेरणी किती झाली? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 13:28 IST

Agriculture News : गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची संततधार (Nashik Rainfall) सुरू असल्याने जमिनीला वाफसा मिळत नसल्याने पिके धोक्यात येऊ शकतात. 

नाशिक : जिल्ह्यात खरीप पिके जोमाने वाढत आहे. मात्र गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पावसाची संततधार (Nashik Rainfall) सुरू असल्याने पिके पिवळे पडण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जमिनीला वाफसा मिळत नसल्याने पिके धोक्यात येऊ शकतात. 

जास्तीच्या पावसाचा फटका भाजीपाला पिकाला (Vegetable Crops) बसण्यास सुरुवात झाली आहे. ७ जुलै अखेर जिल्ह्यात ६४.९७ टक्के खरीप पिकाची पेरणी झाली आहे. याच तारखेला मागील वर्षी ७२ टक्के पेरण्या झाल्या होत्या. मात्र यंदा चांदवड तालुक्याने पेरणीत अव्वलस्थान गाठले. १५ दिवस अगोदरच या तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे तब्बल ११४ टक्के पेरण्या झाल्या. 

पाऊस रिपरिप सुरूच आहे. पाऊस विश्रांती घेत नसल्याने इतर तालुक्यात खरिपाचे पेरणी क्षेत्रवाढीवर त्याचा परिणाम झाला आहे. जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांना यावर्षी मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे दोन आठवडे उशिराने सुरुवात झाली. त्यामुळे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केवळ पाच ते सहा टक्के पेरण्या झाल्या. पावसाने आठवडाभर विश्रांती घेतली, तर पेरणी क्षेत्र १० ते १२ टक्क्यांनी वाढू शकते. मात्र पाऊस असाच सुरू राहिल्यास खरीप हंगाम लांबू शकतो.

मका, सोयाबीनचे होऊ शकते नुकसानपावसाची रिपरिप अशीच सुरू राहिल्यास मका अन् सोयाबीन पिकाला फटका बसू शकतो. या दोन पिकांचे क्षेत्र जिल्ह्यात सरासरी पेरणी क्षेत्राच्या ७० ते ७५ टक्के आहे. पाने पिवळी पडून नुकसान संभवते, तर चांदवड व अन्य तालुक्यात कांद्याची रोपे टाकली जात असून, पाऊस असाच न थांबता सुरू राहिला तर कांदा रोपांना नुकसान संभवते.

भात लागवड मागीलवर्षी ३० टक्के, आता ८ टक्केभात लागवडीसाठी योग्य जमीन, हवामान आवश्यक आहे. मात्र असे वातावरण मिळत नसल्याने यंदा प्रथमच भाताची लागवड जुलैचा दुसरा आठवडा सुरू होऊनही केवळ ८ ते ९ टक्के झाली आहे. सुरगाणा, त्र्यबंकेश्वर, पेठ, इगतपुरी या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पीक भाताचे घेतले जाते. मात्र सरासरीपेक्षा या तालुक्यांमध्ये केवळ पाच ते सात टक्के भाताची पेरणी झाली आहे.

टॅग्स :पेरणीनाशिकलागवड, मशागतशेती क्षेत्रभातपाऊस