Dhan Malani : शेतशिवारात खरीप हंगामातील धान पिकाच्या मळणीची ( Paddy crop Threshing) लगबग सुरू आहे. आजचा शेतकरी हा पारंपरिक साधनांचा वापर न करता आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळला आहे. 'घंटो का काम मिनटोमे' होत असल्याने जुन्या पारंपरिक पद्धतीला बगल देत जिकडे- तिकडे केवळ मळणी यंत्राचीच धामधूम सुरू आहे. पण, अलीकडे पारंपरिक मळणीसाठीचे शेतशिवारातील खळे कुठे दिसेनासे झाले आहे.
पूर्वी धान्याची रास काढण्यासाठी शेतकरी शेतातच खळे (Dhan Malani) तयार करीत असत आणि तेच त्यांचे मळणी यंत्र असे. या खळ्याच्या मध्यभागी एक भक्कम लाकूड रोवले जायचे. त्यांच्या भोवताली गोलाकार लाकडी चोपणीने चोपून गुळगुळीत केली जायची व ती शेणाने सारवून स्वच्छ केली जायची. अशाप्रकारे मळणीसाठी खळ्याची निर्मिती केली जायची. या मानव निर्मित खळ्यात शेतकरी धानाच्या कडपा पसरायचे. मध्यभागी रोवलेल्या खांबाभोवती अथवा लाकडाभोवती बैल बांधले जायचे व बैलजोडी धान्याच्या पसरलेल्या कडपावर गोलाकार फिरवायचे.
बैलांच्या गोल फिरण्याने आपसूकच कडपातून धान्य वेगळे व्हायचे. वेगळे झालेले धान्य वाऱ्याच्या वेगाच्या दिशेला उंचावर उभे राहून उपणले जायचे, त्यात धान्यातील फोलपाटे, कचरा व निरुपयोगी हलका भाग वाऱ्यामुळे पुढे उडून आयचा व धान्य खाली साठून राहायचे. जुन्या काळात धान मळणीसाठी वापरला जाणारा खळा व महत्त्वाचे साधन म्हणजे कारडी ही आज कालबाहा झाल्यासारखी दिसत आहे. कारण, कारडी चालविणे ही त्यावेळची एक कला समजली जायची.
मळणीची पारंपारिक पद्धती
धान उडवित असताना वापरला आणारा भांडवा हासुद्धा तितकाच महत्त्वाचा समजला जायचा. पण, आजच्या आधुनिक युगामध्ये शेतात ना खळा राहिला, ना कारडी, ना सुपाने धान उडविणे, ना भांडवा पद्धती राहिली. तंत्रज्ञानाच्या युगात श्रीमंत शेतकरीच नव्हे तर, सर्वसामान्य शेतकरीही आता शेतीची कामे यंत्रानेच करू लागले आहेत. परिणामी, बैलबंडीद्वारे होणारी धान मळणीची पारंपारिक पद्धती आता लुप्त झाली आहे.
'खळे' म्हणजे जुन्या काळातील मळणी यंत्रच
थोडक्यात खळे म्हणजे जुन्या काळातील एक प्रकारचे मळणी यंत्रच होते. शेतशिवारात धान्य मळणीची कामे जवळपास दहा ते पंधरा दिवसांपर्यंत चालत असत. मात्र, आता सर्वत्र यांत्रिकीकरणावर भर दिला जात आहे. त्यामुळे शेतीकामे करणाऱ्या बैलजोड्यांची संख्याही आता रोडावली आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतकयांची श्रमशक्तीही मोडली आहे, हे ही मात्र तितकेच खरे.
पीक व्यवस्थापनापासून, शेतीच्या सर्व अपडेटसाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉइन व्हा...