राजरत्न सिरसाट
डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे मुख्यालय अकोल्यातून पुण्याला हलविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून विदर्भातील शेतकऱ्यांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Organic Farming)
आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी २०१८ मध्ये अकोल्यात स्थापन झालेल्या या मिशनने अनेक प्रकल्प राबवले आहेत. आता हे कार्यालय हलविल्याने विदर्भातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि सुविधा मिळण्यात अडथळा निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.(Organic Farming)
रासायनिक खतांचा अतिरेक, जमिनीची सुपीकता घटणे, पर्यावरणाचा असमतोल आणि मानव-प्राण्यांच्या आरोग्यावर वाढते संकट या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ऑक्टोबर २०१८ मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन सुरू केले. (Organic Farming)
मिशनची सुरुवात आणि उद्दिष्टे
या मिशनअंतर्गत शेतकऱ्यांना शेतावरच सेंद्रिय निविष्ठा (इनपुट्स) तयार करण्यासाठी अनुदान, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले जाते.
शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) व त्यांचा महासंघ २०२१ मध्ये नोंदवण्यात आला.
समूह संकलन केंद्रे, साठवणूक, प्रक्रिया व विपणन सुविधा उभारण्यात आल्या.
ग्रीन सर्ट बायो सोल्युशन्समार्फत तृतीय पक्ष प्रमाणनाची सोय उपलब्ध आहे.
या माध्यमातून शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीऐवजी सेंद्रिय शेतीकडे वळण्यास चालना मिळाली आहे.
अकोल्यातील संशोधनाची भक्कम पायाभूत सुविधा
अकोला जिल्ह्यात आधीपासूनच जैविक शेतीशी संबंधित संशोधनाची मजबूत पार्श्वभूमी आहे.
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे राज्य मुख्यालय अकोल्यात आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे सेंद्रिय शेतीवर संशोधन सुरू आहे.
विदेशी संस्थांच्या सहकार्याने देशातील पहिला सेंद्रिय शेती अभ्यासक्रम अकोल्यात सुरू करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यालय हलविण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
शेतकऱ्यांची नाराजी
मुख्यालय हलविण्याचा निर्णय समोर आल्यानंतर विदर्भातील शेतकरी व कृषी संघटनांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आधीच पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय अकोल्यातून हलविण्यात आले होते.
आता सेंद्रिय शेतीशी संबंधित प्रमुख कार्यालय देखील हलवल्यास विदर्भातील शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळण्यात अडचणी निर्माण होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे कार्यालय नैसर्गिक शेतीअंतर्गत समाविष्ट करून मुख्यालय पुण्यात हलविण्याबाबत शासनाने परिपत्रक जारी केले असल्याची माहिती प्रकल्प संचालक मुरलीधर इंगळे यांनी दिली.
मिशन नैसर्गिक शेती विभागात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यालय हलविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.- मुरलीधर इंगळे, प्रकल्प संचालक, जैविक शेती मिशन
डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनच्या मुख्यालय हलविण्याच्या निर्णयामुळे विदर्भातील सेंद्रिय शेतीसाठी उभारलेल्या पायाभूत सुविधांच्या उपयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक शेतकऱ्यांचा आग्रह आहे की, मुख्यालय अकोल्यातच ठेवून विदर्भातील सेंद्रिय शेतीला अधिक चालना द्यावी.