Orange Orchard Crisis : जुन्या संत्रा बागांचे पुनर्जीवन करून त्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ करण्यासाठी राज्य शासनाने सन २००८ मध्ये 'फळबाग पुनर्जीवन योजना' सुरू केली. मात्र तब्बल १७ वर्षांनंतरही ही योजना संग्रामपूर तालुक्यात कागदावरच रेंगाळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
योजनेंतर्गत मिळणारे अनुदान, तांत्रिक मार्गदर्शन आणि पुनर्बाधणी प्रक्रियेचा लाभ एकाही शेतकऱ्याला नीट मिळत नसल्याने शेकडो हेक्टर क्षेत्रातील संत्रा बागा अक्षरशः वाचविण्यासाठी तडफडत 'अखेरची घटका' मोजत आहेत.
१८ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू केलेली योजना प्रत्यक्ष अंमलबजावणीअभावी गाडीत पडलेली दिसते. संग्रामपूर तालुक्यातील संत्रा बागांचे अस्तित्व टिकवायचे असेल तर शासनाने तातडीने हस्तक्षेप करून योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे.
१७ वर्षे उलटली पण योजना शेतकऱ्यांपासून दुरावलेलीच
फळबाग पुनर्जीवन योजनेअंतर्गत हेक्टरी ४० हजार रुपये अनुदान देण्याचे नियोजन आहे.
या रकमेचा वापर खालील कामांसाठी करायचा असतो
* जुन्या बागांची पुनर्बाधणी
* वाळलेली झाडे पुनर्जीवित करणे
* रोगराई नियंत्रण
* मायक्रोन्यूट्रिएंट्स, बुरशीनाशक, कीटकनाशक फवारणी
* तांत्रिक मार्गदर्शन
मात्र जनजागृतीच्या अभावामुळे अनेक शेतकऱ्यांना या योजनेचे अस्तित्वच माहीत नाही. अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, ऑनलाइन नोंदणी याविषयी मार्गदर्शन नसल्याने बहुतांश शेतकरी पात्र असूनही लाभापासून वंचित आहेत.
तीन वर्षांत एकही उद्दिष्ट नाही; योजनाच ठप्प!
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२०-२१, २०२१-२२, २०२४-२५ या तीन वर्षांत तालुक्याला एकही उद्दिष्ट मिळाले नाही.
फक्त २०२२-२३ आणि २०२३-२४ या दोन वर्षांत मिळून फक्त १० शेतकऱ्यांना अनुदान मिळाले.
या आकडेवारी वरून लक्षात येते की, योजनेला कोणतीही गती मिळाली नाही.
चालू वर्षात अर्ज वाढले पण.....
चालु वर्ष २०२५ -२६ मध्ये आतापर्यंत ४० शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज दाखल केले आहेत.
मात्र पुढील सत्यापन, शेततपासणी, संमतीपत्र, अनुदानमंजुरी याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेकडो हेक्टरवरील जुनी संत्रा बागा नष्ट होण्याच्या मार्गावर
अंमलबजावणीतील ढिलाई, कृषी विभागाचा उदासीन संवाद आणि प्रत्यक्ष कामावर देखरेख नसल्याने या योजनेचा तालुक्यातील एकाही बागेला फारसा फायदा झाला नाही.
त्यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील संत्रा बागा धोक्यात आहेत. अनेक बागांमध्ये उत्पादन ४०–६० टक्क्यांनी घटले आहे.
झाडे करपण्याचे प्रमाण चिंताजनक
गेल्या काही वर्षांत संत्रा बागांमध्ये खालील रोगांमुळे मोठे नुकसान झाले आहे. यात मर रोग, खोडकूज, मुळकूज, अचानक पानगळ या रोगांमुळे झाडे कमकुवत होत आहेत आणि अनेक ठिकाणी करपण्याचे प्रमाण वाढले आहे. योग्य वेळी पुनर्जीवन प्रक्रिया न राबविल्यास संपूर्ण तालुक्याचे संत्रा उत्पादनच कोसळण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
योजना प्रत्यक्षात आणा, बागा वाचवा
स्थानिक संत्रा उत्पादक शेतकरी काय सांगतात
कृषी विभागाने जागृती मोहीम राबवावी
अर्ज करणाऱ्यांची तपासणी त्वरित करावी
अनुदान मिळण्याची प्रक्रिया पारदर्शक व ऑनलाइन ट्रॅकिंगसह करावी
तालुक्यास स्वतंत्र वार्षिक उद्दिष्टे द्यावीत
