Agriculture News : राष्ट्रीय कापणी पश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे, मॅग्नेट प्रकल्प, संभाजीनगर आणि कृषी विज्ञान केंद्र तोंडापूरद्वारे संत्रा पिकाची लागवड तंत्रज्ञान या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. पी.पी. शेळके, वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर यांनी संत्रा पिकातील समस्या आणि त्यावरील उपाययोजना या संदर्भात विवेचन केले.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये संत्रा लागवडीसाठी बराच वाव असून त्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने लागवड केल्यास आणि कृषी विज्ञान केंद्राचा सल्ला नियमितपणे घेतल्यास शेतकऱ्यांना हे पीक अधिक उत्पादन देणारे ठरू शकेल. सद्य परिस्थितीमध्ये निसर्ग कोपला असताना ज्या प्रकारच्या अडचणी इतर पिकांना येतात, त्यापासून काही प्रमाणात शेतकऱ्यांना फळपिकाकडे वळल्यास आधार मिळू शकतो, असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सहभाग नोंदवला. ते म्हणाले की, नाशिक येथील सह्याद्री फार्मर प्रोडूसर कंपनीच्या माध्यमातून संत्रा पिकामध्ये नाविन्यपूर्ण वाणांचा समावेश करण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. त्या वाणाचा शेतकऱ्यांनी वापर केल्यास त्यांना हमखास बाजारपेठ मिळू शकेल. त्या दृष्टिकोनातून कृषी विज्ञान केंद्र हिंगोली आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी यांचा समन्वय घडवून आणण्यासाठी पुढाकार घेऊ असे त्यांनी नमूद केले.
कृषी विज्ञान केंद्र सगरोळीचे संतोष चव्हाण यांनी संत्रा लागवडीतील विविध समस्या आणि त्याचे निराकरण या विषयावर सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला मॅग्नेट छत्रपती संभाजीनगर येथील राहुल शेळके राष्ट्रीय कापणी पश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे येथील रवींद्र देशमुख यांच्यासह सहकारी उपस्थित होते. या प्रशिक्षणाला हिंगोली जिल्ह्यातील विविध तालुक्यातून शेतकरी आले होते. याशिवाय कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.