Orange Crop Insurance : संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा विमा परताव्याच्या प्रतीक्षेत आहेत. हवामान आधारित फळपीक विम्याअंतर्गत नुकसानभरपाई रक्कम मे महिन्यात ट्रिगर पूर्ण झाल्यानंतरही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. यामुळे दिवाळीचा सण गेल्यानंतरही विमा रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. (Orange Crop Insurance)
मागील वर्षी उशिरा परतावा, यंदा पुन्हा तोच अनुभव
अमरावती जिल्ह्यातील संत्रा बागायतदारांनी २०२४-२५ हंगामासाठी 'सॉम्पो युनिव्हर्सल इन्शुरन्स कंपनी' कडून हवामान आधारित फळपीक विमा काढला होता. मात्र, या कंपनीनेही विमा परताव्यात जाणीवपूर्वक विलंब केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.
मागील वर्षी 'रिलायन्स इन्शुरन्स कंपनी' कडूनही परतावा उशिरा मिळाला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी यंदा विमा काढण्यास टाळाटाळ केली होती. परिणामी, मागील हंगामात विमा न काढल्यामुळे अनेक उत्पादक नुकसानभरपाईस मुकले.
ट्रिगर पूर्ण, तरी परतावा नाही
या वर्षी आंबिया बहाराच्या काळात मार्च महिन्यात तापमान ४० अंशांपेक्षा अधिक आणि एप्रिल-मे महिन्यात ४५ अंशांपेक्षा जास्त झाले होते. त्यामुळे फुलगळ, फळगळ, बुरशीजन्य रोग आणि झाडे सुकण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसून आल्या.
यासंदर्भात मे महिन्यात ट्रिगर पूर्ण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी परताव्याची अपेक्षा धरली होती. पण आता पाच महिने उलटूनही विमा रक्कम मिळालेली नाही.
टोल फ्री क्रमांकावर माहितीच नाही!
विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक १४४४७ वर अनेक शेतकऱ्यांनी संपर्क साधला, परंतु योग्य व स्पष्ट माहिती मिळाली नाही.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, 'कंपनीकडून कोणतीही ठोस माहिती दिली जात नाही. फक्त लवकरच जमा होईल' असे सांगण्यात येते.
विमा घेतलेल्या शेतकऱ्यांचा तपशील
अमरावती जिल्ह्यातील एकूण ३,८३७ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी
३,८७५ हेक्टर क्षेत्रासाठी सुमारे ३ कोटी ३० लाख रुपये विमा हप्ता भरला होता.
मात्र, इतकी मोठी रक्कम भरूनही वेळेवर नुकसानभरपाई न मिळाल्याने शेतकरी संतप्त आहेत.
दरवर्षी विमा रकमेच्या मागे धावावे लागते. मागील वर्षाचा परतावा मिळालेला नाही आणि यावर्षीच्या आंबिया बहाराच्या विम्याची तारीख आली आहे. वेळेवर परतावा मिळाला नाही तर शेतकरी नवीन विमा घेण्यास नकार देतील.- पुष्पक खापरे, शेतकरी.
विमा परताव्याचा ट्रिगर मे महिन्यातच पूर्ण झाला आहे. जिल्हास्तरावरून कंपनीला वारंवार पत्रव्यवहार करून पाठपुरावा सुरू आहे. लवकरच परतावा वितरित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- राहुल सातपुते, जिल्हा कृषी अधीक्षक, अमरावती
शेतकऱ्यांची मागणी काय?
हवामान आधारित फळपीक विमा कंपन्यांवर वेळेवर परतावा न दिल्यास दंडात्मक कारवाई व्हावी.
विमा प्रक्रिया पारदर्शक व शेतकऱ्यांसाठी सोपी करावी.
पुढील हंगामासाठी विमा नूतनीकरणाची मुदत वाढवावी, जेणेकरून शेतकरी हक्काचा लाभ घेऊ शकतील.
हवामानातील अनिश्चिततेमुळे संत्रा उत्पादक शेतकरी दरवर्षी मोठ्या जोखमीचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत विमा हा त्यांच्या सुरक्षेचा आधार ठरतो. मात्र, परतावा वेळेवर न मिळाल्यास योजनांवरील विश्वास कमी होत आहे. शासन आणि विमा कंपनीने तत्काळ हस्तक्षेप करून शेतकऱ्यांच्या खात्यात परतावा जमा करावा, अशी सर्वत्र मागणी आहे.
