Onion Seed Production : जालना तालुक्यात कांदा बीजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा जबरदस्त आर्थिक फटका बसला आहे. मधमाश्यांच्या अभावामुळे परागीकरण पूर्ण न झाल्याने बीजोत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. (Onion Seed Production)
लाखो रुपयांची गुंतवणूक करूनही शेतकऱ्यांच्या हातात केवळ २५ ते ३० हजार रुपयेच उरले आहेत. ही परिस्थिती धक्कादायक असून, अशा शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
यावर्षी जालना तालुक्यातील सुमारे २५० हेक्टर क्षेत्रावर कांदा बीजोत्पादन करण्यात आले. या उत्पादन प्रक्रियेत परागीकरणासाठी मधमाश्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. मात्र, हवामान बदल, रासायनिक फवारण्या आणि जैवविविधतेतील घट यामुळे यंदा मधमाश्यांनी कांद्याच्या फुलांकडे पाठ फिरवली. (Onion Seed Production)
त्याचा परिणाम बीज भरलेच नाही. उत्पादनात कमालीची घट झाली आणि बीजोत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडले.
रामदास कावळे या शेतकऱ्याने २ एकर क्षेत्रावर कांदा बीजोत्पादनासाठी सुमारे १ लाख रुपये खर्च केले. यात कांद्याच्या खरेदीसाठी ६० हजार आणि मजुरी, खते, औषधे यासाठी ४० हजारांचा समावेश आहे. मात्र, उत्पादनातून केवळ २५ ते ३० हजार रुपयांचेच उत्पन्न झाले. (Onion Seed Production)
शेतकऱ्यांची स्थिती बिकट
एका हेक्टरमध्ये सामान्यतः १० क्विंटल कांद्यापासून ३५ ते ४० किलो बीज मिळते. पण यंदा तेही शक्य झाले नाही. शेतकऱ्यांना मजुरी द्यावी की नुकसान भरून काढावे, या पेच निर्माण झाला आहे.
शासनाकडे मदतीची मागणी
नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नष्ट झाल्यास सरकार मदत करते, तसाच विचार मधमाश्यांच्या अभावामुळे झालेल्या नुकसानाबाबत व्हावा, अशी मागणी बियाणे उत्पादक शेतकरी करत आहेत. बीजोत्पादनाचा प्रोत्साहनपर विचार केला जावा आणि यावर्षीचा तोटाही भरून दिला जावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हे ही वाचा सविस्तर : Onion Market: ऐन हंगामात बाजारात दराचा रोलर कोस्टर; जाणून घ्या काय आहे कारण