सटाणा : सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला अवघा ५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाल्याने त्यांनी बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांना कोंडून घेत तीव्र आंदोलन केले.
बागलाण तालुक्यातील कन्हे येथील शेतकरी जितेंद्र साळुंखे यांनी आपला कांदा विक्रीसाठी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत आणला होता. मात्र लिलाव प्रक्रियेदरम्यान त्यांच्या कांद्याला केवळ ५० रुपये प्रति क्विंटल इतकाच दर मिळाल्याचे समोर आले. हा दर ऐकताच उपस्थित शेतकरी संतप्त झाले. आधीच नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागले असताना बाजारातही योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त केला.
तीन दिवसांपूर्वी ३०० रूपये इतका दर मिळाला असतांना आत मात्र केवळ ५० रूपये दर मिळाल्याने संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याने भरलेला ट्रॅक्टर बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर उभे केले. यावेळी बाजार समितीमधील संचालक, व्यापारी, व प्रशासन यांना जाब विचारण्यासाठी गेले असता बाजार समितीचे लोखंडी गेट बंद करून घेत कर्मचाऱ्यांना दोन तास डांबून ठेवण्यात आले. पोलिसांना पाचारण करण्यात आल्यानंतर १७५ दर देण्याचा तोडगा निघाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
पोलिसांनी केली मध्यस्थी
घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी, गणेश सोनवणे आणि बाळासाहेब टिळेकर यांनी आंदोलनकर्त्या शेतकन्यांशी संवाद साधत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी व्यापारी, बाजार समिती प्रशासन आणि शेतकरी यांच्यात मध्यस्थी करत चर्चा घडवून आणली.
दीर्घ चर्चेनंतर अखेर संबंधित कांद्याला १७५ रुपये प्रति क्विंटल दर देण्याचे मान्य करण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. पोलिस प्रशासनाने संयमाने परिस्थिती हाताळत तोडगा काढल्यामुळे शेतकरी आणि उपस्थित नागरिकांकडून पोलिसांच्या समन्वयात्मक भूमिकेचे कौतुक करण्यात आले.
दहावीचा निकाल जाहीर, अकरावी ॲडमिशनसाठी कुठली कागदपत्रे लागतात, 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
