नाशिक : दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणाऱ्या उन्हाळी कांद्याची लागवड यंदा मात्र एक ते दीड महिना उशिराने सुरू झाली आहे. बागलाण तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये सध्या ही लागवड वेगाने सुरू आहे. परतीचा पाऊस व वातावरणातील बदलामुळे कांदा रोपे खूप मोठ्या प्रमाणात खराब झाल्यामुळे उशिराने लागवड सुरू झाली आहे.
बागलाणच्या पश्चिम पट्टयात मोठ्या प्रमाणात आदिवासी मजूरवर्ग ऊसतोडणीसाठी बाहेरगावी गेला असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात मंजूर टंचाई निर्माण झाली आहे. प्रत्येक गावात इतर भागातून मजूर आणावे लागत असून, तेही रोजंदारीवर न येता कंत्राट पद्धतीने काम करीत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच मजुरीचे दर वाढले आहेत.
कांदा लागवडीसाठी ३०० ते ४०० रुपये रोज असा दर झाला असून, बियाणे, खते, औषधे आदींमुळे कांदा उत्पादनासाठी खर्चातही वाढ झाली आहे. यंदा कांद्याला बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णतः बिघडले आहे. कांदा पीक लवकर दोन पैसे देतो या आशेने शेतकऱ्यांची कांदा लागवडीसाठी धडपड सुरू आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रोपे मिळेल त्या भावाने विकत घेऊन कांदा लागवडीवर भर दिला आहे.
फेब्रुवारीपर्यंत लागवड
यंदा लांबलेला परतीचा पाऊस व खराब हवामानामुळे ६० टक्के कांदा रोपे खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांनी एक-दोन नाही चारवेळा कांद्याची रोपे टाकली. त्याच्यावर दर आठवड्याला फवारणी केली तरीही रोप चांगले नसल्यामुळे कांदा लागवडीत घट होणार आहे.
सध्या कांद्याच्या रोपाला सोन्याचा भाव मिळत आहे. तरीही रोपे मिळत नाहीत. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत रोपे टाकल्यामुळे यंदा कांदा लागवड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कांदा लागवडी सुरूच राहतील, असे चित्र सध्या तरी दिसत आहे.
