Nuksan Bharpayee : अतिवृष्टी, पुर आणि पिकांच्या नुकसानाने मराठवाड्यातील शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला होता. मात्र, राज्य शासनाकडून आता या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा जाहीर करण्यात आला आहे. (Nuksan Bharpayee)
रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी व बियाणांसाठी तब्बल ४ हजार कोटी रुपयांचा मदतनिधी शासनाने मंजूर केला असून, याचा लाभ २९ लाखांहून अधिक बाधित शेतकऱ्यांना मिळणार आहे. (Nuksan Bharpayee)
मराठवाड्यातील जिल्हानिहाय निधी वाटप
जून ते सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, बीड, जालना, लातूर, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यांना हा मदतनिधी देण्यात येणार आहे.
| जिल्हा | बाधित शेतकरी | बाधित क्षेत्र (हेक्टर) | मदत (कोटी रुपये) |
|---|---|---|---|
| छत्रपती संभाजीनगर | ६,८८,३४५ | ६,०८,९५६.७८ | ६०८ |
| हिंगोली | २,९७,७०९ | ३,४१,२८४.०६ | ३४१ |
| नांदेड | ७,८०,३२७ | ७,२७,९३२.४० | ७२७ |
| बीड | ७,३७,६१० | ७,०८,०८५.६६ | ७०८ |
| जालना | ६,२१,३८८ | ४,६१,५१६.५८ | ४६१ |
| धाराशिव | ५,०६,६१४ | ५,७७,५४४.६२ | ५७७ |
| लातूर | ५,१९,२७४ | ५,६५,५८५.६८ | ५६५ |
| परभणी | ४,३९,२९७ | ४,९५,११०.१९ | ४९५ |
एकूण मदतनिधी : ४,०५१ कोटी रुपये
२९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत
राज्य शासनाने 'डीबीटी' (Direct Benefit Transfer) यंत्रणेद्वारे २ हजार ८६ कोटी रुपयांचा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. ही मदत रब्बी हंगामातील पेरणी, बियाणे खरेदी आणि शेतमाल उत्पादन पुनर्संचयित करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
३२ लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान
मराठवाड्यात ३२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि भाजीपाला या पिकांवर मोठा फटका बसला होता. या पार्श्वभूमीवर शासनाने ही मदत योजना जलद गतीने राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतजमिनीच्या नुकसानीसाठी स्वतंत्र निधी
अतिवृष्टीमुळे केवळ पिकांचं नाही तर शेतजमिनींचंही मोठं नुकसान झालं आहे. यासाठी शासनाने स्वतंत्र निधी मंजूर केला आहे.
| जिल्हा | नुकसानभरपाई |
|---|---|
| छत्रपती संभाजीनगर | ६७ लाख रुपये |
| धाराशिव | १० कोटी रुपये |
| हिंगोली | ६८ लाख रुपये |
| एकूण | २४.६३ कोटी रुपये |
शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय
रब्बी हंगामातील उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी ही मदत अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पिकांची पुनर्पेरणी, बियाणे खरेदी आणि खत पुरवठा यासाठी शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळेल.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* मिळालेल्या निधीचा उपयोग योग्य वेळी रब्बी पिकांच्या पेरणीसाठी करावा.
* प्रमाणित बियाण्यांचा वापर करावा आणि हवामान अंदाज लक्षात घेऊन पेरणी नियोजन करावे.
* जमिनीच्या दुरुस्ती आणि पुनरुज्जीवनासाठी स्थानिक कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा.
हे ही वाचा सविस्तर : e-KYC : ई-केवायसीसाठी टेकडीवर; नेटवर्कच्या शोधात शेतकऱ्यांची धावपळ
