अकोला : जून महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने ६ हजार १३६ शेतकऱ्यांसाठी तब्बल ४ कोटी ५ लाख ९० हजार रुपयांचा मदतनिधी मंजूर केला आहे. (Nuksan Bharpai)
मात्र, मदतीची रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नसून, शासनाच्या पोर्टलवर याद्या अपलोड करण्याचे काम सुरूच असल्याने शेतकरी प्रतीक्षेत आहेत. (Nuksan Bharpai)
चार तालुक्यांतील शेतकऱ्यांचे नुकसान
गेल्या जून महिन्यात जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अकोट, बाळापूर, पातूर व बार्शिटाकळी या चार तालुक्यांत अतिवृष्टी व पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले.
४,९०९ शेतकरी : ३,१८३.५५ हेक्टरवरील जिरायत पिकांचे नुकसान
५० शेतकरी : २२.२१ हेक्टरवरील बागायत पिकांचे नुकसान
१,११७ शेतकरी : ५८४ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान
एकूण ६ हजार १३६ शेतकऱ्यांच्या ३ हजार ७८९ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांचे नुकसान नोंदविण्यात आले होते. यासाठी शासनाने ६ ऑगस्ट रोजीच्या निर्णयानुसार मदतनिधी मंजूर केला.
याद्या अपलोडचे काम सुरूच
नुकसानभरपाईची रक्कम खात्यात जमा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या 'ई-पंचनामा पोर्टल'वर अपलोड करण्याचे काम अद्याप सुरूच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, याबाबत संभ्रमाची स्थिती आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपलोड प्रक्रिया पूर्ण होताच मदत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केली जाईल.
शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि प्रतीक्षा
अतिवृष्टी व पुरामुळे आधीच मोठे नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांना मदतनिधीच्या रकमेची मोठ्या आतुरतेने वाट पाहावी लागत आहे. मंजूर झालेली मदत प्रत्यक्षात मिळेपर्यंत त्यांच्या आर्थिक अडचणी दूर होणार नाहीत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.