नाशिक : निफाड तालुक्यातील कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना पुन्हा चालविण्यास तसेच कारखान्याचा भाडेकराराचा कालावधी १५ वर्षाऐवजी २० वर्षांचा करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश शासनाचे उपसचिव अं. पा. शिंगाडे यांनी सोमवारी काढले.
मात्र, तीन वर्षात गाळप क्षमतेत वाढ केली नाही, तर कारखान्याचा भाडेकराराचा कालावधी आपोआप १५ वर्ष होईल, अशी सूचना शासनाकडून देण्यात आली आहे.
कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना लि., काकासाहेब नगर, ता. निफाड, जि. नाशिक (अवसायनात) हा कारखाना स्व. अशोकराव बनकर ना. पतसंस्था लि., पिंपळगाव (ब.) यांना चालविण्यास देण्यात आलेला होता. सदर संस्थेने हंगाम २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ मध्ये उसाचे यशस्वीरित्या गाळप केले. परंतु, प्रतिकूल परिस्थितीमुळे हंगाम २०२४-२५ मध्ये कारखाना संस्थेला बंद ठेवावा लागला.
मात्र, अनुभव पाहता हा साखर कारखाना २५०० टन प्रतिदिन या गाळप क्षमतेचा निर्माण झाल्यास तो आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो. त्यामुळे साखर कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता २५०० मे. टन करण्यासाठी कारखान्यामध्ये आर्थिक गुंतवणूक करून भाडेतत्त्वावर घेणाऱ्या संस्थेला भाडेकराराचा कालावधी १५ वर्षाऐवजी २० वर्षाचा करण्यास याव्दारे शासनमान्यता देण्यात आली आहे.
भाडेकरार संपुष्टात आणण्याची होती मागणी
संबंधित साखर कारखाना दि. १६ ऑगस्ट २००६ पासून अवसायनात घेण्यात आला आहे. सन २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ गाळप हंगाम चालू करण्यात आले. तथापि, या हंगामामध्ये प्रतिकूल परिस्थितीमुळे कारखान्याचे अत्यल्प गाळप झालेले आहे. त्यामुळे सन २०२४-२५ मध्ये कारखाना बंद ठेवला होता.
आता त्यांचा भाडेकरार संपुष्टात आणण्याची मागणी करण्यात आली आहे. भाडेकरार संपुष्टात आणून नव्याने निविदा प्रक्रिया राबवून भाडेतत्त्वावर देण्याबाबत विनंती केली आहे. त्यानुसार पुन्हा एकदा चालवण्यास मान्यता तसेच कालावधी वाढविण्यात आला आहे.