गोंदिया : परसुड, देवधान, देवतांदूळ या नावाने ओळखले जाणारे निसर्गनिर्मित धान्य हे आता दुर्मीळ होत चालले असून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कृषी विभागाने या कामी पुढाकार घेऊन संशोधन करून पौष्टिक धान्याची ही जात वाचवावी अशी मागणी परिसरातून केली जात आहे.
ग्रामीण भागातील गावागावांतून गावाच्या बाहेर परसुड ही नैसर्गिकरीत्या तलाव, जंगलात आजूबाजूला पाणथळ असलेल्या खड्यांमध्ये, रस्त्याच्या बाजूला पाणी साचून असलेल्या खड्यांमध्ये उगवलेली असते. आधी खूप जास्त प्रमाणात मिळायची, सध्या ती दुर्मीळ होत असून नैसर्गिक उत्पादन कमी होत चालले आहे. आता शेतात वेगवेगळ्या प्रकारची रसायने, रासायनिक खते, औषधे वापरली जातात. त्याचा परिणाम परसुड, देवतांदळाच्या नैसर्गिक उत्पादनावर झाला आहे.
पूर्वी मुबलक प्रमाणात गावागावांत परसुड मिळायची, उपवासासाठी देखील हे वापरले जायचे. जास्त प्रमाणात मिळायची तर किंमतपण कमी होती. आता सर्व रासायनिक फवारण्या व कीटकनाशके यांच्या प्रादुर्भावामुळे नैसर्गिक उत्पन्नावर परिणाम होत आहे. परसुङ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. परसुड धान्यापासून प्रोटिनयुक्त जीवनसत्त्व आपल्या शरीराला मिळतात. त्यात औषधी गुणधर्म देखील आहेत. प्रसूती झालेल्या बाळंतीण महिलांना परसुड तांदळाचा भात खायला देत होते.
दुष्काळी परिस्थितीत मोठा आधार
अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती ही केवळ अन्न पुरवठ्यापुरती मर्यादित नसून, ती आपल्या परंपरा, संस्कृती आणि जीवनशैलीचा जिवंत दस्तऐवज आहे. अशाच एका विस्मृतीत गेलेल्या परंपरेचा वारसा म्हणजे देवतांदूळ होय. पूर्वी ग्रामीण भागात शेती ही पूर्णतः निसर्गावर, पावसावर अवलंबून होती. देवतांदूळ हे लोकांच्या उपजीविकेचे महत्त्वाचे साधन होते. दुष्काळाच्या काळात जेव्हा शेते ओस पडायची, तेव्हा हा देवतांदूळ लोकांच्या जीवनाचा आधार बनायचा.
आम्ही तलाव जिवंत करण्याच्या प्रक्रियेमध्ये परसुडचे धान पुन्हा तलाव व आजूबाजूच्या खेड्यांमध्ये लावत आहोत. ज्या महिला परसुडचे धान्य गोळा करतात, त्यांच्याकडून विकत घेऊन तलावांमध्ये पावसाळ्यात जिथे खड्ड्यांच्यामध्ये पाणी साचले असते तिथे बीज टाकून लागवड करावी लागेल.
- सरिता मेश्राम, जिवंत तत्राव अभियान कार्यकर्त्या.
नवीन पिढीतील महिला कष्टाने मागे पडत आहे. परसुड गोळा करण्याचे काम नवीन पिढी करायला तयार नाही. नव्हे त्यांना त्याची ओळखही नाही. धान्याची मुबलकता हे एक कारण असू शकते. तसेच दिवसेंदिवस पारंपरिक गोष्टीसाठी कष्ट उपसण्याची वृत्ती कमी होत चालले आहे. त्यामुळे हे नैसर्गिक देवतांदूळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
- शांताबाई मेश्राम, रहिवासी, मुंगली.
